बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनीधी
नीरा नरसिंहपुर ते पिंपरी बुद्रुक पट्ट्यामध्ये मे महिन्यात झालेल्या बिगर मोसमी पावसाने सगळीकडेच हाहाकार माजवला. त्यामुळे शेतीची कामे ठप्प झाली होती. पिकांचे प्रचंड नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला. आता पावसाने उघडीत दिल्याने पुणे जिल्हाच्या पूर्व भागमध्ये नरसिहपुर, गिरवी, टणु ,पिंपरी बुद्रुक, गणेशवाडी, सराटी, लुमेवाडी, लिंबुडी, गोंदी, ओझरे, आडोबा वस्ती, शिन्दे वस्ती,इत्यादी गावातील शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना सुरुवात केली आहे.
या वर्षीच्या कडक उन्हाळ्यानंतर पावसाळ्यापूर्वीच बिगर मोसमी पावसाचे जोरदार आगमन झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. सर्व पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले; परंतु आता पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी शेतातील कामाला सावरू लागला आसून शेतीच्या कामांना वेग आला आहे. उन्हाळ्यात नांगरणी करुन शेती तापायला ठेवली जाते. त्यामुळे पिके जोरदार येऊन उत्पादनात वाढ होते; परंतु यावर्षी उन्हाळ्यातच पाऊस पडल्याने जमीन तापायला वेळ मिळाला नाही. आता जमिनीत वाफसा आल्याने नांगरट, फणनी, ऊस बांधणी, तन काढणे, नवीन ऊस, लागवडीसाठी जमिनीची मशागत करणे ,यासारखी शेतातील कामे चालू आहेत.
उन्हाळ्यातच यावर्षी विहिरी व बोअरवेल भरल्या आहेत. पावसाने उघडीप दिल्याने शेतीच्या कामाची लगबग चालू झाली आहे. आडसाली ऊस लावण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. या वर्षी बाजरी, ऊस, मका, भुईमूग व फुलशेती वाढणार आहे.
नांगरणी, कोळपणी व जमीन सुपिक करून जास्ती जास्त पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी बळीराजा शेतकरी जोराने कामाला लागलेला आहे.



