Home Social सर्व मिळून चिमूर विधानसभेला ‘चंदनाची विधानसभा’ अशी नवीन ओळख देण्याचा प्रयत्न करू...

सर्व मिळून चिमूर विधानसभेला ‘चंदनाची विधानसभा’ अशी नवीन ओळख देण्याचा प्रयत्न करू :- प्रा.डॉ.अजय घ. पिसे… — ‘चंदनाची शेती’ कार्यशाळेला प्रयोगशील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

     रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

        वर्षोनुवर्षे पारंपारिक शेती करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कोणतीही वाढ होतांना दिसत नाही आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती ही दिवसेंदिवस हलाखीची होत आहे. यावर उपाय म्हणून घनश्यामजी पिसे कृषी संशोधन केंद्र, सातारा-कोलारा (तह. चिमूर) येथे ‘चंदनाची शेती’ यावर एक दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरासाठी अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

         दहा वर्षात परिपक्व होणारी चंदनाची शेती हि शेतकऱ्यांसाठी वरदान आहे, यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन भरघोस वाढण्यास मदत होईल. आताच नियोजन केल्यास दहा वर्षानंतरचा शेतकऱ्याच्या मुलाचा शिक्षणाचा, लग्नाचा, किंवा आरोग्याच्या खर्चासाठी कामात येवू शकतो. आपण सर्व मिळून चिमूर विधानसभेला ‘चंदनाची विधानसभा’ अशी नवीन ओळख देण्याचा प्रयत्न करू असे कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांनी सांगितले.

         विदर्भात चंदन लागवडीचा इतिहास पाच हजार वर्षांपासूनचा जुना आहे. परंतु मधल्या काळात आक्रमणकर्त्यांनी चंदनाची लुट केल्यामुळे आताच्या पिढीला विदर्भातील चंदनाच्या जंगलाबद्दल पुरेशी माहिती नाही. विदर्भातील वातावरण हे चंदन लागवडीसाठी पोषक असल्यामुळे चांगली वाढ होऊ शकते. या कार्यशाळेत चंदन लागवडीचे बारकावे, जागेसबंधी माहिती, जमिनीची मशागत, विक्री करिता शासनाच्या योजना यावर सविस्तर माहिती देण्यात आली.

        या शिबिराला प्रा. डॉ. अजय पिसे, विलास दिघोरे, विशाल इंदोरकर यांनी मार्गदर्शन केले. हि कार्यशाळा प्रत्यक्षात वीस फुट उंचीचे वाढ झालेल्या चंदनाच्या परिसरात घेण्यात आली हे विशेष.