अतुल देशमुख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

पुणे : शिरुर लोकसभा मतदारसंघात महायुतीला मोठा फटका बसला आहे. खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील भाजप नेते अतुल देशमुख यांनी भाजपचा रामराम करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी अंकुश काकडे, प्रशांत जगताप, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, तालुकाध्यक्ष हिरामण सातकर, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, सुधीर मुंगसे उपस्थित होते.

          खेड तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य आणि भाजपचे खेड-आळंदी विधानसभा निवडणूक प्रमुख अतुल देशमुख यांनी रविवारी भारतीय जनता पार्टीचा प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. राज्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्राद्वारे देशमुख यांनी आपला राजीनामा पाठविला होता.

          अतुल देशमुख यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक लढवली होती. ते सध्या अजित पवारांसोबत असलेल्या खेड-आळंदीचे आमदार दिलीप मोहिते यांच्याकडून थोड्या मतांनी पराभूत झाले होते. मात्र, दिलीप मोहिते अजित पवारांसोबत महायुतीत सहभागी झाल्याने अतुल देशमुख नाराज झाले होते.

            राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर अतुल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे, देशमुख म्हणाले, मागील अडीच वर्षात स्वाभिमानाला ठेच लागली. समन्वयही साधता आला नाही. मागील एक दीड वर्षात हीन वागणूक मिळाल्याने थांबण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, देशमुख भाजप सोडून गेल्याने खेड-आळंदी मतदारसंघात महायुतीला मोठा फटका मानला जात आहे.