पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘बारामती’मध्ये सभा…? — महायुतीच्या जिल्ह्यातील उमेदवारांसाठी ‘खडकवासल्या’त सभेसाठी प्रयत्न…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पवार कुटुंबीयांसाठी प्रतिष्ठेच्या झालेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजिण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मोदींची सभा महायुतीच्या बारामतीसह मावळ, शिरूर आणि पुणे अशा महायुतीच्या सगळ्या उमेदवारांसाठी असेल, असा दावा करण्यात येत असला, तरी बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात सभेच्या नियोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे. येत्या एप्रिलअखेर किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात ही सभा होईल, असा दावाही करण्यात येत आहे.

             ‘बारामती’मध्ये विद्यामान खासदार आणि शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार या दोघांसाठी ही लढत प्रतिष्ठेची झाली असून, सध्या या दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू झाला आहे.

          गेल्या दोन वर्षांपासून भाजपनेही बारामती हा शरद पवारांचा बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली आहे. त्याच हेतूने गेल्या लोकसभा निवडणुकीतील ‘ए फॉर अमेठी’च्या धर्तीवर ‘बी फॉर बारामती’ मिशन हाती घेण्यात आले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्र्यांनी बारामतीचे सातत्याने दौरे केले. राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगल्याने बारामतीमध्ये शरद पवार यांना घेरण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मोदींची सभा घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

         सन २०१४ मध्ये महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे ६५ हजार मतांनी निवडून आल्या होत्या. मात्र, मोदी लाटेत जानकर यांनी सुळे यांना कडवी लढत दिली होती. त्या वेळीही बारामतीमध्ये मोदी यांची सभा घेण्याचे नियोजित होते. मात्र, ती सभा रद्द झाली होती. सध्याच्या बदलत्या राजकीय परिस्थितीत मात्र मोदींची सभा घेण्याचा चंग महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी बांधला आहे.

         गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा झाली होती. या वेळी बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत येत असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात सभा घेण्याचे नियोजन असल्याचे समजते. याद्वारे बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीला मताधिक्य देणाऱ्या या भागातील शहरी मतदारांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे हा शहरी भाग पुणे लोकसभा मतदारसंघालाही जवळ असल्याने पुण्यालाही याचा फायदा होईल, असे आडाखे बांधण्यात येत आहेत.

          पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदर्भात सध्या दोन सभा होणार आहेत. जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांसाठीही सभा घ्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. सभा होणार की नाही, हे अद्यापही निश्चित झालेले नाही. मात्र, सभेसाठी प्रयत्नशील आहोत :-चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री 

पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या चारही उमेदवारांसाठी सभा आयोजिण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खडकवासला मतदारसंघात सभा व्हावी, अशी आमची इच्छा आहे. मात्र, सभेसाठी प्रशस्त मैदान आणि वाहनतळाची सुविधा असेल, अशाच ठिकाणी सभा आयोजिण्यात येईल. :- प्रदीप गारटकर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस