गडचिरोली जिल्ह्यासाठी पुढील ५ दिवसाकरीता हवामान आधारित कृषी सल्ला…

राजेंद्र रामटेके

    प्रतिनिधि

• भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर च्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार, गडचिरोली जिल्ह्यात पुढील पाच दिवस दिनांक ०९ ते १३ फेब्रुवारी २०२४ दरम्यान आकाश आंशिक ढगाळ राहण्याची अधिक शक्यता वर्तवण्यात आली,

• दिनांक १० व ११फेब्रुवारी २०२४ रोजी काही विरळ ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची अधिक शक्यता,

• दिनांक १२ व १३ फेब्रुवारी २०२४ रोजी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची अधिक शक्यता,

• दिनांक १०, ११ व १२ फेब्रुवारी २०२३ रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

• विदर्भामध्ये पुढील ५ दिवसामध्ये कमाल तापमानामध्ये फारसा बदल होणार नाही.

• विदर्भामध्ये पुढील ४८ तासामध्ये किमान तापमानात फारसा बदल होणार नाही त्यानंतर २ ते ३ अंश सेल्सिअस ने किमान तापमानात वाढ होईल.

सामान्य सल्ला

• पाऊस व मेघगर्जनेसह विजांचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील हरभरा, तूर, जवस, लाखोली तसेच इत्यादी रब्बी हंगामातील पिकांची काढणी व मळणी पुढील २४ तासामध्ये प्राधान्याने उरकून घ्यावी. काढणी/कापणी केलेल्या शेतमालाची कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळणी ची कामे शक्य नसल्यास शेतमाल पावसाच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी तसेच कापणी केलेला शेतमाल ताडपत्री किंवा प्लास्टिक शीटच्या सहाय्याने झाकून ठेवावा.

• पावसाचा अंदाज लक्षात घेता हंगामी पिके,भाजीपाला पिकामध्ये आंतरमशागतीची कामे (डवरणी, खुरपणी इत्यादी.) तसेच कीड व रोग व्यवस्थापनासाठी कृषी रसायनांची फवारणीची कामे पावसाचा अंदाज लक्षात घेता पुढील ३ दिवस पुढे ढकलावी.

• पावसाचा अंदाज लक्षात घेता, कृषी उत्पन्न बाजार समिती मधील खरेदीदार व इतर शेतमाल खरेदीदारांनी शेतकऱ्यांद्वारा विक्रीसाठी आणलेला शेतमाल उघड्या जागेवर व न ठेवता शेड मध्येच साठवावा.

• पावसाचा अंदाज लक्षात घेता उशिरा पेरणी केलेल्या गहू, हरभरा, जवस, मोहरी इत्यादी तसेच भाजीपाला व फळबागांना पुढील ३ ते ४ दिवस ओलीत करणे टाळावे.

• विजांचा कडकडाट होण्याची शक्यता लक्षात घेता गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या व इतर पाळीव जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचे टाळावे. जनावरे हे खुल्या पाण्याचे स्त्रोत, नदी किंवा तलाव व ट्रॅक्टर व इतर धातूच्या अवजारांपासून दूर ठेवावे.

• पाऊस व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता लक्षात घेता, शेतकरी व शेतमजूर यांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. शेतातील कामे शक्यतो सकाळच्या वेळी उरकून घेण्याला प्राधान्य द्यावे. शेतमजुरांना शेतामध्ये एकत्रित समूहाने काम करू न देता दोन व्यक्तीमध्ये जास्तीत जास्त अंतर ठेवावे. शेतात आसरा घेताना पाण्याचे स्त्रोत (विहीर, तलाव, नदी इत्यादी), उंच ठिकाणे (झाडे, उंचवटे), धातूचे अवजारे या पासून जास्तीत जास्त अंतरावर आसरा घ्यावा. उंच ठिकाणांवर वीज आकर्षित होत असल्याने कोणत्याही परिस्थितीमध्ये झाडाखाली आसरा घेणे टाळावे.

द्वारा :- जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, सोनापुर, गडचिरोली.