निराधार वृद्धांना ‘वास्तल्य’ देणारं आळंदीचा मातोश्री आश्रम..

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

पुणे:-

आळंदी : माणूस स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी सतत धडपत असतो.मात्र ज्या भागात आपला जन्म झाला,ज्या भागात लहानचा मोठा झालो,ज्या समाजाने आपल्याला प्रेम दिलं,त्या समाजाचं देखील आपण काही तरी देणं लागतो,हे विसरून चालणार नाही.

       आणि हेच मनी बाळगत महाराष्ट्रातील प्रमुख तिर्थक्षेत्र असलेल्या आळंदी देवाची परिसरातील नियतीताई शिंदे आणि त्यांचे कुटुंबीय अनाथ,पिडीत,बेघर,नागरिकांसाठी सेवाभावी वृत्तीने नियती फौंडेशनच्या माध्यमातून मातोश्री आश्रम नावाने वृध्दाश्रम सुरू केले आहे.

         या वृद्धाश्रमाला आता 5 वर्षे पूर्ण झाली असून पन्नास ते साठ आजी-आजोबा यामध्ये राहातात. नियती शिंदे आणि त्यांचे कुटुंबीय त्यांच्या आई वडिलांसारखी इथे राहणाऱ्या आजी आजोबांची काळजी करतात. आळंदी ग्रामीण भागातील चर्होली खुर्द जवळ विश्रांतवड येथे त्यांचं हे मातोश्री वृद्धाश्रम आहे. 

    मातोश्री वृद्धाश्रमाच्या नियती शिंदे यांचं फारस शिक्षण झालं नाही,मात्र त्यांना समाजसेवेची खूप आवड आहे.सध्या या वृद्धाश्रमात अनेक आजी आजोबा आहेत. त्यांची सेवा करून खूप आनंद मिळतो, आमच्या या सेवा कार्यात काही सामाजिक संस्थांचा देखील हातभार लागतो.

         त्यामुळेच हे सर्व शक्य असल्याची प्रतिक्रिया नियती शिंदे यांनी दिली आहे. प्रत्येक जण आई-वडिलांसारखा या वृद्धाश्रमात राहणारे प्रत्येक आजी-आजोबा हे आई – वडिलांसारखे आहेत, अशी शिंदे यांची भावना आहे. ‘त्यांचं दुःख ऐकल की आपलं ही मन खूप दुःखी होतं, ज्यांना जन्म दिला तीच मुल आज आई वडिलांना सांभाळत नाहीत. त्यांची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं आहे. तुम्ही घराबाहेर एखाद्या वृद्धाश्रमात आहात, याची जाणीव त्यांना होऊ नये असा आमचा प्रयत्न असतो. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आमचं जीवन यशस्वी झाल्यासारखं वाटतं.

         ते देखील आम्हाला मुलासारखं मानतात. मनातील कोणतीही गोष्ट हक्काने सांगतात,’ असा अनुभव नियती शिंदे यांनी सांगितला. आता हेच आमचं घर मातोश्री वृध्दाश्रमच आता आमचं घर बनल आहे. आम्ही सर्व इथे आनंदाने राहतो. आम्हाला कोणाला ही घरची आठवण येत नाही. नियती शिंदे आणि कुटुंब हे दोघं आमची खूप काळजी घेतात. आम्हाला लागेल ती वस्तू लगेच आणून देतात. मातोश्री वृद्धाश्रमात भजन, कीर्तन, प्रवचन, वेगवेगळे मनोरंजन करणारे खेळ खेळले जातात. आम्हाला इथे टीव्ही आहे. त्यामुळे आमचं चांगलं मनोरंजन होत.तसेच आम्हाला बाहेर देखील फिरायला घेऊन जातात.

        त्यामुळे आता वृध्दाश्रमच आमचं घर झाल्याची भावना इथं राहणाऱ्या एका आजींनी व्यक्त केली. नियती शिंदे यांच्या नियती फौंडेशनच्या या सेवा कार्याची विविध सामाजिक संघटनांनी दखल घेऊन त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.आळंदी आणि परीसरातील अनेकांनी आपल्या वाढदिवस मातोश्री वृद्धाश्रमात जाऊन साजरा केला आहे.