Home Maharashtra गिरवी येथील नीरा नदीवरील बंधाऱ्याचा भरावा चालू वर्षी पाण्याने वाहून गेल्यामुळे शेतीला...

गिरवी येथील नीरा नदीवरील बंधाऱ्याचा भरावा चालू वर्षी पाण्याने वाहून गेल्यामुळे शेतीला व पिण्यासाठी पाण्याचा गंभीर प्रश्न ?..तर शेतकरी संकटात… — पाणी पुरवठा योजना बंद झाल्याने पाणी पिण्यासाठी एक तरी निरा नदीत आवर्तन सोडण्याची ग्रामस्थांची मागणी… 

  बाळासाहेब सुतार

 निरा नरसिंहपुर प्रतिनिधी..

       निरा नदीवरील गिरवी व लुमेवाडी तालुका इंदापूर येथील बंधार्‍यांची कामे निकृष्ट दर्जाची झाल्यामुळे प्रत्येक वर्षी पावसाळ्यात बंधारे पाण्याने वाहून जाऊ लागले, कोट्यावधी रुपये खर्च करून सुद्धा कामे निकृष्ट दर्जाची का अशी चर्चा परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने होत आहे.

          ठेकेदारांचा मनमानी कारभार गिरवी (ता. इंदापूर) येथील निरा नदीवरील बंधाऱ्याचा भराव यावर्षीही पुराच्या पाण्याने वाहून गेला आहे. त्यामुळे गिरवी गणेशगाव मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून जमिनीचे वाळवंट झाले आहे. अधिकारी व ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे सलग चार वर्षांपासून कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

         गिरवी (ता. इंदापूर) व गणेशगाव (ता. माळशिरस) यांना जोडणारा नीरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पुराच्या पाण्याने चौथ्यांदा वाहून गेला आहे. गिरवी बाजूकडील जवळपास 200 ते 300 फुटा पेक्षा जास्त भाग चालू वर्षी पाण्याने वाहून गेला आहे.

       गिरवी-गणेशगाव बंधाऱ्याचा इंदापूर आणि माळशिरस तालुक्यांतील शेकडो एकर शेतीला फायदा होतो, तसेच दोन्ही तालुक्यांतील शेतीशी निगडित वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते, तर शालेय विद्यार्थ्यांना जवळचा एकमेव मार्ग आहे.

       परंतु अनेक दिवसापासून नीरा नदीवरील बंधारे यांच्या कामाची चौकशी नाही वाहून गेलेल्या बंधाऱ्याचे काम चालू नाही. 

        यामुळे विद्यार्थी, नागरिक व शेतकरी भरडला जात आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

        दोनशे ते तीनशे फूट एवढा असणारा भराव पाण्याच्या रेट्यामुळे फुटून वाहून गेला आहे. तसेच बंधाऱ्याच्या अनेक दारे व पिलरलाही पाण्याच्या रेट्यामुळे घोका निर्माण झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मागील सात महिन्यापासून नीरा नदी पाण्याअभावी कोरडी पडली आहे. त्यामुळे शेतातील पिके करपून गेली आहेत.

        मात्र नीरा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांची आशा पल्लवित झाली होती. पण पाण्याच्या रेट्यामुळे बंधाऱ्याचा भराव पुन्हा वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांची आशा धुळीस मिळाली आहे. शेतक-यांच्या समोर पिके वाचवण्याची मोठी समस्या निर्माण झाली असून शेतीचे वाळवंट होण्याची भिती आहे.

       राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सध्या आगोदर बंधाऱ्यांच्या पहिल्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिला. परंतु जलसंपदा विभागाच्या पंढरपूर व ओपूर कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी यांनी ठेकेदारांनी संगनमत करून निकृष्ट दर्जाचे काम केल्यानेच पुन्हा दोन वेळेस बंधारा फुटून भराव वाहून गेला आहे.

        अशा ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई करून बंधाऱ्याला झालेला खर्च वसूल करण्याची मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे. तसेच बंधाऱ्यांची दुरुस्ती तातडीने करून नीरा नदीवरील प्रत्येक बंधाऱ्यात पाणी सोडून पिके वाचवावी अशीही मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.