दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी :- आळंदी नगरपरिषद निवडणुकीची रणधूमाळी दिवसेंदिवस रंगत चालली आहे. यंदाच्या निवडणुकीत मात्र एक वेगळीच लाट पाहायला मिळत आहे. पारंपरिकपणे नगरपरिषदेत वर्चस्व गाजवणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांना या वेळी तरुण उमेदवारांनी कडवी टक्कर देण्याची चिन्हे दिसत आहेत.
शहरात मागील काही वर्षांत झालेल्या प्रभागरचनेमुळे आणि नव्या मतदारांच्या वाढत्या सहभागामुळे तरुण नेतृत्वाचा आवाज अधिक बुलंद झाला आहे. वारकरी नगरीत शिक्षण, रोजगार, वाहतूक, पाणीपुरवठा, आणि डिजिटल सुविधा यांसारख्या मुद्द्यांवर तरुण मतदारांकडून थेट प्रश्न विचारले जात आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक नवोदित तरुण नेते स्थानिक पातळीवर ठोस कामगिरी करून मैदानात उतरले असून, त्यांनी जुन्या पिढीच्या नेत्यांसमोर नवा पर्याय उभा केला आहे.
शहरातील पारंपरिक राजकारणात अनेक वर्षे काम केलेले ज्येष्ठ नेते मात्र “अनुभवाचं मूल्य” सांगत आपली बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. “तरुणाईत ऊर्जा आहे, पण शहराचा विकास अनुभवावरच उभा राहतो,” असा दावा त्यांच्याकडून केला जात आहे.
दरम्यान, विविध पक्षांमध्ये तिकीट वाटपाच्या हालचालींमध्ये तरुण कार्यकर्त्यांचा दबदबा जाणवत आहे. पक्षीय नेत्यांनाही नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
आळंदी नगरपरिषदेची ही निवडणूक पारंपरिक नेतृत्व आणि नव्या पिढीतील नेतृत्व यांच्यातील थेट संघर्ष ठरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या लढतीची रंगत आणखी वाढणार आहे.



