Home Social मौजा शंकरपूर येथील जॉब कार्ड धारकांची ई-केवायसी ग्रामपंचायत स्तरावर शिबिर आयोजित करून...

मौजा शंकरपूर येथील जॉब कार्ड धारकांची ई-केवायसी ग्रामपंचायत स्तरावर शिबिर आयोजित करून पूर्ण करण्याबाबत उपसरपंच अशोक चौधरी यांनी केली मागणी…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

       मौजा शंकरपूर ग्रामपंचायत अंतर्गत मनरेगा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या शेकडो जॉब कार्ड धारकांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे. 

        या निष्क्रियतेमुळे संबंधित मजुरांना त्यांच्या कायद्याने हक्क असलेल्या मनरेगा मजुरीचा लाभ मिळत नाही.जे अत्यंत अन्यायकारक व निष्काळजी प्रशासनाचे द्योतक आहे.यामुळे मजूरांची ई-केवायसी करणे संबंधाने तात्काळ शिबिर घेण्याची मागणी उपसरपंच अशोक ज्ञानेश्वर चौधरी यांनी साहाय्यक गट विकास अधिकारी श्री.बांदूरकरक यांना निवेदनाद्वारे केली आहे.

        अनेक वेळा मजुरांनी पंचायत समिती व ग्रामपंचायतीकडे तोंडी व लेखी स्वरूपात अर्ज दिले असूनही कोणतीही ठोस कार्यवाही अथवा शिबिराचे आयोजन करण्यात आले नाही. 

        तालुक्याच्या ठिकाणी जाण्यास मजूर वर्गाला दैनंदिन मजुरीचा त्याग करावा लागतो,तसेच प्रवास खर्चाचा आर्थिक बोजा सहन करावा लागतो. त्यामुळे बहुसंख्य मजुरांची केवायसी प्रक्रिया अडथळ्यात आहे. 

        मनरेगा योजनेअंतर्गत घरकुल,सिंचन,रस्ते,जनावरांचे गोटे,संरक्षण भिंती,स्मशानभूमी शेड आदी कामांमध्ये सहभागी होण्यासाठी जॉब कार्ड सक्रिय असणे अत्यावश्यक आहे असे उपसरपंच अशोक चौधरी यांचे म्हणणे आहे. 

        परंतु ई-केवायसी नसल्यामुळे संबंधितांना या योजनांचा लाभ मिळत नाही.ज्यामुळे ग्रामीण मजूर वर्गावर उपजीविकेचे संकट ओढवले आहे. त्यामुळे पंचायत समिती चिमूर प्रशासनाने या प्रकरणात तात्काळ प्रशासकीय जबाबदारीची जाणीव ठेवून मौजा शंकरपूर येथे ग्रामपंचायत स्तरावर ई-केवायसी शिबिराचे आयोजन करणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.

         हे शिबिर तत्काळ न लावल्यास ग्रामपंचायत व नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल,याची प्रशासनाने नोंद घ्यावी असे निवेदनात नमूद केले आहे.

        ही मागणी जनहितार्थ व मनरेगा कायद्यानुसार लाभार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी करण्यात येत आहे.आपण या विषयावर तातडीने आदेश जारी करून संबंधित विभागास शिबिराच्या आयोजनासंबंधी दिशा द्याव्यात अशी विनंती मजूरांच्या हितार्थ उपसरपंच अशोक चौधरी यांनी केली आहे.

          तद्वतच जिल्हाधिकारी चंद्रपूर,मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद चंद्रपूर यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.