Home Social संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा : कार्तिक वारीसाठी एसटीच्या जादा फेऱ्या…...

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा : कार्तिक वारीसाठी एसटीच्या जादा फेऱ्या… — १२ ते १८ नोव्हेंबरदरम्यान भाविकांसाठी पुणे विभागाचे विशेष नियोजन…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिनानिमित्त येत्या आठवड्यात सुरू होणाऱ्या कार्तिक वारीसाठी राज्यभरातून लाखो वारकरी आळंदीकडे येणार आहेत. या भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाकडून १२ ते १८ नोव्हेंबरदरम्यान जादा एसटी गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

       वारीच्या काळात १४ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत सर्वाधिक गर्दी अपेक्षित आहे. भाविकांना आळंदीला पोहोचण्यासाठी तसेच परतीच्या प्रवासासाठी कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, खानदेश आदी भागात जाण्यासाठी थेट बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आळंदीहून सुरू होणाऱ्या प्रमुख बससेवा…

     मुख्य आळंदी स्थानकातून : स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन, रायगड, ठाणे, पालघर आदी मार्गांवर एसटी फेऱ्या.

        आळंदी–चाकण बसस्थानकातून : राजगुरुनगर, नारायणगाव, संगमनेर, नाशिक, मुरबाड, कल्याण, कोपरगाव, शिर्डी, मनमाड, मालेगाव, धुळे या ठिकाणी गाड्यांची सोय.

          आळंदी–वडगाव घेनंद मार्गावरून : शिक्रापूर, शिरूर, अहमदनगर (अहिल्यानगर), छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, बीड, परभणी, नांदेड, नागपूर, जळगाव या ठिकाणी थेट सेवा उपलब्ध.

डुडुळगाव वाहतूक चौकी बसस्थानकावरून : आळंदी–देहू मार्गावरील एसटी सेवा कायम.

         देहू फाटा आगारातून राज्यभरातील प्रवाशांसाठी एसटी सेवा पुरवण्यात येणार असून, भाविकांना मार्गदर्शनासाठी आळंदी स्थानकात विशेष चौकशी कक्ष व व्यवस्थापक नेमण्यात आले आहेत.

         वारीच्या काळात एसटी हाच आळंदीला जोडणारा प्रमुख दुवा ठरत असून, ज्येष्ठ व महिला वारकरी एसटी प्रवासाला प्राधान्य देत आहेत. भाविकांच्या मोठ्या गर्दीचा विचार करून लवकरच गाड्यांच्या वेळापत्रकाचे सविस्तर नियोजन जाहीर होणार असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.