दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : प्रदक्षिणा रोड परिसरातील जाहूरकर महाराज संस्थेत अध्यात्मिक शिक्षणासाठी राहणाऱ्या १२ वर्षीय मुलीवर शारीरिक व मानसिक शोषण झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आळंदी नगरपरिषदेने तातडीची कारवाई करत संस्था तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले.
शनिवारी (दि. ७) मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संस्थेची पाहणी करून गंभीर त्रुटी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली. संस्थेतील ४३ मुले व ४ मुली अशा एकूण ४७ बालकांचे तीन शासकीय व मान्यताप्राप्त बालगृहांमध्ये सुरक्षितपणे पुनर्वसन करण्यात आले आहे.
सकाळी सुमारे ११ वाजता मुख्याधिकारी खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली आळंदी नगरपरिषदेचे अधिकारी, आळंदी पोलिसांच्या दामिणी महिला पथकातील कर्मचारी तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी यांनी संस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली.
या पाहणीत संस्थेतील व्यवस्थापन आणि सुविधांबाबत अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज व आधार नोंदी उपलब्ध नव्हत्या. पालकांची संमतीपत्रे तसेच छाननी समिती अस्तित्वात नव्हती. नियमानुसार कर्मचारी वर्ग नव्हता. अभ्यासिका व भोजन हॉल एकाच खोलीत असल्याचे दिसून आले. तसेच स्वयंपाकघर व निवासाची जागा अपुरी असून पुरेशी व हवेशीर स्नानगृहे व स्वच्छतागृहे नसल्याचेही निदर्शनास आले.
तपासणीत भोजनाबाबतही गंभीर बाबी समोर आल्या. भोजनाचा निश्चित मेनू नसल्याचे आढळले असून विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्रीचे उरलेले अन्न सकाळी दिले जात असल्याचे सांगितले. याशिवाय संस्थेत गेट रजिस्टर, प्रथमोपचार पेटी, तक्रार पेटी तसेच नियम व अटींचे फलक नसल्याचेही स्पष्ट झाले.
तपासणीदरम्यान सर्वात गंभीर बाब म्हणजे संस्थेकडे मुले व मुली निवासी ठेवण्याचा शासनाच्या कोणत्याही विभागाचा वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. महिला व बाल विकास विभागाच्या ३ जुलै २०२५ च्या शासन निर्णयातील तरतूद २२ (अ) नुसार अशा अनधिकृत व नियमभंग करणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्याचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत. त्या अधिकाराचा वापर करून आळंदी नगरपरिषदेने संस्थेला तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले.
संस्थेतील ४३ मुले व ४ मुली अशा एकूण ४७ बालकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने ज्ञानेश बालमंदिर (फुलगाव, मरकळ रोड), ज्ञानमंदिर बालगृह (नारकरवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे) आणि सह्याद्री बालगृह (पंकटिका, घोडेगाव रोड, मंचर, जि. पुणे) या तीन शासकीय व मान्यताप्राप्त बालगृहांमध्ये हलविण्यात आले आहे.
या कारवाईवेळी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, नगरपरिषद कर व प्रशासकीय सेवा विभागाच्या सीमा चारभे, लेखापरीक्षक प्रदीप आवारी, सहायक प्रकल्प अधिकारी वैशाली पाटील, सीएलटीसी अभियंता मिथिल पाटील, दामिणी पथकाच्या पूजा श्रीहरी नाईक व श्वेता विलास शेलकर, समुदाय संघटक अर्जुन घोडे, बाल संरक्षण अधिकारी शत्रुघ्न रुस्तुम खोकले तसेच पोलिस कर्मचारी मच्छिंद्र शेंडे आदी उपस्थित होते.
दरम्यान, या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाईसाठी जिल्हाधिकारी पुणे, पोलीस उपायुक्त पिंपरी-चिंचवड, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, उपविभागीय अधिकारी खेड (राजगुरूनगर) तसेच धर्मादाय आयुक्त पुणे यांना संस्थेचा परवाना रद्द करण्याबाबत आणि पुढील कार्यवाहीसाठी पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.



