Home Maharashtra वाणिज्य विभागाची औद्योगिक क्षेत्रभेट, विद्यार्थ्यांनी घेतली बायोमास पॅलेट उद्योगाची माहिती…

वाणिज्य विभागाची औद्योगिक क्षेत्रभेट, विद्यार्थ्यांनी घेतली बायोमास पॅलेट उद्योगाची माहिती…

   चेतक हत्तीमारे 

भंडारा जिल्हा प्रतिनिधी 

लाखनी : समर्थ महाविद्यालय, लाखनी येथील वाणिज्य विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी लाखनी येथील मेषर्स शिवशक्ती बायोमास पॅलेट मिल या उद्योगाला भेट देऊन बायोमास पॅलेट उत्पादन प्रक्रियेची सविस्तर माहिती घेतली.

         बायोमास पॅलेट हे पर्यावरणपूरक इंधनाचा एक महत्त्वपूर्ण प्रकार असून ते वनस्पतीजन्य टाकाऊ पदार्थ, शेतमालाचे अवशेष तसेच विविध औद्योगिक वेस्टपासून तयार केले जाते. या इंधनाचा उपयोग प्रामुख्याने उष्णता निर्माण करणे, ऊर्जा उत्पादन करणे तसेच विविध औद्योगिक प्रक्रियांमध्ये केला जातो. स्वच्छ ऊर्जा निर्मिती आणि कमी कार्बन उत्सर्जन या दृष्टीने बायोमास पॅलेट उद्योगाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

          लाखनी येथील उद्योजक श्री. वाघाळे यांनी या क्षेत्रात पुढाकार घेत बायोमास पॅलेट निर्मितीचा प्रकल्प उभारला असून पर्यावरणपूरक ऊर्जानिर्मितीच्या दिशेने त्यांनी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या औद्योगिक भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना बायोमास पॅलेटची उत्पादन प्रक्रिया, त्याचे औद्योगिक उपयोग तसेच भविष्यातील संधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. टाकाऊ वस्तूंचा योग्य वापर करून इंधनाची निर्मिती कशी केली जाते याची प्रत्यक्ष माहिती देण्यात आली.

         यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. या औद्योगिक क्षेत्रभेटीच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. सुनंदा देशपांडे, डॉ. सुरेश बनसपाल तसेच डॉ. संगीता हाडगे यांचे विशेष सहकार्य लाभले.