आळंदीत भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा… — भाजपची कार्यपद्धती ही कार्यकर्ता केंद्रित व आधारित आहे : डॉ.राम गावडे — वैचारिक बांधिलकीतून भाजपची स्थापना झाली : हभप संजय महाराज घुंडरे 

दिनेश कुऱ्हाडे

  प्रतिनिधी

आळंदी : भाजपाचा स्थापना दिवस देशभरात मोठ्या उत्साहात स्थापना दिवस साजरा करण्यात येत आहे. देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त संतभुमी अलंकापुरी नगरीत भाजप शहराध्यक्ष किरण येळवंडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुदामराव उकीरडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष किरण येळवंडे, आध्यात्मिक आघाडीचे हभप संजय महाराज घुंडरे, भाजपचे नेते डॉ.राम गावडे, माजी नगरसेवक सागर भोसले, पांडुरंग वहीले, सचिन काळे, कार्याध्यक्ष बंडुनाना काळे, प्रमोद बाफना, अमोल विरकर, आकाश जोशी, माऊली बनसोडे, नाना झोंबाडे, चारुदत्त प्रसादे, संदीप पगडे, भागवत काटकर, संकेत वाघमारे, मंगल हुंडारे, संगिता पफाळ तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना संजय महाराज घुंडरे यांनी सांगितले की भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली तीच मुळात वैचारिक आधारावर तत्कालीन जनता पक्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेल्या वैचारिक बांधिलकीतून उफाळून आलेल्या मतभेदांचा परिणाम म्हणून भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. सुरुवातीला तर सत्तेच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाचा विचारसुद्धा केला जात नव्हता. १९८४ साली तर लोकसभेतले संख्याबळ अवघ्या दोन खासदारांवर आले होते. संख्येच्या बळावर काँग्रेसने दिल्लीतील सत्तेला पूर्ण विळखा घातला होता. त्या परिस्थितीत सत्ता तर सोडाच, पण पक्षाचे अस्तित्व तरी टिकेल का अशी चर्चा सर्व माध्यमात चालायची. पण त्यामुळे खचून न जाता त्यावर मात करण्याचे आव्हान स्वीकारत भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन नेते व कार्यकर्ते यांनी कार्य सुरूच ठेवले. व तिथूनच पक्षाच्या वेगळेपणाचा परिचय झाला. 

यावेळी भाजप मध्ये नुकताच प्रवेश केलेले डॉ.राम गावडे यांनी सांगितले की भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती ही कार्यकर्ता केंद्रित व आधारित आहे.भारताच्या राजकीय इतिहासाचा अभ्यास केल्यास असे अनेक राजकीय पक्ष नाहीसे झाल्याचे दिसून येते. पण, देश प्रथम हे ब्रीद असलेला भारतीय जनता पक्ष मात्र सर्वांहून वेगळा आहे. देशाच्या विकासात प्रत्येकाचे योगदान आहे व पाहिजे हे ओळखूनच मी आणि माझ्या हजारों कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाची वाट धरली आहे.