दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : सामाजिक बांधिलकी, सेवाभावी वृत्ती आणि युवकांना दिशा देणारे नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे जय गणेश प्रतिष्ठानचे संस्थापक सागर उर्फ गोविंदा कुऱ्हाडे आता राजकारणात पाऊल ठेवत आहेत. आळंदी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या उमेदवारीबद्दल शहरात चांगली चर्चा सुरू झाली आहे. समाजकार्यातून पुढे आलेला हा तरुण चेहरा लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रभाग क्रमांक चार मधून ते निवडणुक लढविणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून सागर (गोविंदा) कुऱ्हाडे यांनी विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आळंदी शहरात ठसा उमटवला आहे. जय गणेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी गणेशोत्सव काळात पर्यावरणपूरक, समाजप्रबोधनपर गणेशोत्सवाचा संदेश दिला, रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, वृक्षारोपण मोहिमा, असे उपक्रम नियमित राबवले. याशिवाय गरीब, गरजू आणि आजारी नागरिकांना मदत करून त्यांनी समाजात आपली ओळख सेवाभावी तरुण कार्यकर्ता अशी निर्माण केली आहे.
कुऱ्हाडे यांनी धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही सक्रिय सहभाग घेतला असून, ज्ञानेश्वर माऊलींच्या कार्तिकी व आषाढी वारीत ते दरवर्षी स्वयंसेवक म्हणून कार्य करतात. यात्रेकरूंना पाणी, आरोग्य आणि निवास व्यवस्था पुरविण्याचे कार्य त्यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचा पाया केवळ राजकीय नाही, तर भावनिक आणि सामाजिक असा दृढ बनला आहे.
“आळंदी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी युवकांच्या शक्तीला एकत्र आणणे, पारदर्शक प्रशासन निर्माण करणे आणि नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविणे हे माझे ध्येय आहे,” असे सागर (गोविंदा) कुऱ्हाडे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “जय गणेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी नेहमीच लोकांसोबत राहिलो आहे. आता त्याच जनसेवेचा विस्तार लोकप्रतिनिधी म्हणून करायचा आहे.”
स्थानिक तरुणांमध्ये कुऱ्हाडे यांच्या उमेदवारीबाबत उत्साहाचे वातावरण असून, अनेक समाजघटक त्यांना पाठिंबा देत आहेत. जय गणेश प्रतिष्ठानच्या उपक्रमांना लाभलेले सकारात्मक प्रतिसाद पाहता त्यांच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास असल्याचे स्पष्ट दिसते. नागरिकांचा विश्वास, युवकांचा उत्साह आणि समाजसेवेचा वारसा यांच्या बळावर सागर उर्फ गोविंदा कुऱ्हाडे यांचा राजकीय प्रवास आळंदी शहराच्या नव्या विकास अध्यायाची सुरुवात ठरू शकतो, अशी भावना शहरात व्यक्त होत आहे.



