मुद्रांक विक्रेत्यांकडून ग्राहकांची आर्थिक लूट… — मुद्रांक जिल्हाधिकारी यांचेकडे भाकपाची निवेदनाद्वारे तक्रार…

उमेश कांबळे ता प्र भद्रावती :

 ग्राहकांकडून मुद्रांक विक्रेते शासकीय दरानुसार मुद्राकांचे शुल्क न घेता मनमानी पद्धतीने शुल्क घेत असल्याने त्यांचेवर कारवाई करून ग्राहकांची होत असलेली आर्थिक पिळवणूक थांबण्यात यावी. अशा आशयाचे निवेदन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव राजू गैनवार यांनी तहसीलदार अनिकेत सोनवणे मार्फत मुद्रांक जिल्हाधिकारी यांना दिले.

    इतर कामासोबत सध्या शैक्षणिक सत्र सुरू झाल्याने वेगवेगळ्या दाखल्यांसाठी मुद्रांकाची आवश्यकता असते.त्यामुळे मुद्रांकाची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचाच फायदा घेऊन मुद्रांक विक्रेते शासकीय दरानुसार मुद्रांक शुल्क न घेता मनमानी पद्धतीने शुल्क आकारून ग्राहकांची लूट करीत आहे. मुद्रांक विक्रेते शंभर रुपयाचा लिखित मुद्रांक पाच रुपयाच्या कोर्ट फी स्टॅम्पसह ग्राहकांना दोनशे रुपयांमध्ये विकत असल्याची बाब अनेक ग्राहकांच्या माध्यमातून समोर आली आहे. तसेच खरेदी विक्रीच्या लिखित मुद्रांका बाबतही तसेच आहे. ही होणारी लूट थांबविण्यात यावी. तसेच मुद्रांक विक्रेत्यांना शासकीय मुद्रांकांचे विक्री दर फलक लावावयाच्या सूचना द्याव्या अशी मागणी निवेदनात करण्यात आली. सदर निवेदन मुद्रांक जिल्हाधिकारी चंद्रपूर, तहसीलदार, दुय्यम निबंधक आणि उपकोषागार भद्रावती यांना देण्यात आले.