दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी – श्री क्षेत्र ज्ञानेश्वर महाराज, आळंदी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक पार पडली. वारीच्या काळात गर्दीचे नियोजन, वाहतूक व्यवस्था, पार्किंग, मनुष्यबळ नियोजन आणि कायदा-सुव्यवस्थेच्या उपाययोजनांबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर आयुक्त सारंग आव्हाड, उपायुक्त डॉ.शिवाजी पवार, बापु बांगर, सहायक आयुक्त राजेंद्रसिंग गौर, आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भिमराव नरके, प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, डॉ.भावार्थ देखणे, अॅड.राजेंद्र उमाप, ह.भ.प.चैतन्य महाराज लोंढे, श्रीमहंत पुरुषोत्तम महाराज, मुरलीधर पाटील आणि अॅड.डॉ.रोहीणी पवार, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीरयां चाही सहभाग होता.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी वाहतूक कोंडी, गर्दी नियंत्रण, आपत्कालीन व्यवस्था आणि सुरक्षा उपायांचा आढावा घेतला. यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय साधून नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
वारी काळात भाविकांच्या सोयीसाठी पोलीस प्रशासन, महापालिका, आरोग्य यंत्रणा व देवस्थान समिती यांच्यात समन्वय साधण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. सुरक्षित आणि नियोजनबद्ध वारी घडवून आणण्याचा निर्धार यावेळी सर्व मान्यवरांनी व्यक्त केला.



