आरमोरी शहर बनलाय अवैध धंद्याचा बालेकिल्ला….. — मद्यविक्री सारख्या अवैध धंद्याचा खेळ चालतो खुल्लमखुल्ला….. — जिल्ह्यात दारुबंदी नावापुरतीच, वास्तविकतेत मात्र वेगळाच बवाल….  — जबाबदार कोण? शासन की जनता एक अनुत्तरीत सवाल?..

 

प्रितम जनबंधु

संपादक 

         गडचिरोली जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण व मुख्य बाजारपेठ असलेल्या आरमोरी शहरात अनेक अवैध धंद्यांना ऊत आले असून शहराच्या विविध ठिकाणी भरदिवसा चौकाचौकात देशी, विदेशी, इंग्लिश दारुचा महापुर दिसुन येत असल्याचे पावलोपावली जाणवते. त्याप्रमाणेच अवैधरित्या इतर छुपेधंदे अगदीच राजरोसपणे बिनधास्त चालत असल्याने एकप्रकारे आरमोरी शहर अवैध धंद्यांचा ‘बालेकिल्ला’ बनला की काय? याबाबत जनमानसात चर्चेला उधाण येत आहे. याचबरोबर संबंधित विभाग निद्रावस्थेत गेले की काय? दारुबंदी मुक्तिपथकाची कारवाई थंडावली की काय? असा यक्षप्रश्न उपस्थित होत आहे.

             जिल्ह्यात १ एप्रिल १९९३ रोजी दारूबंदी करण्यात आली. मात्र या निमित्ताने लपुन छपुन थोड्याफार प्रमाणात मद्य विक्री करणारे आज दारुचे ठेकेदार बनले आहेत. उलट आमचं कोण काय वाकडं करणार? या तोऱ्यात वावरतात व माफीयाराज चालवत आहेत. यामुळे तळीरामाची संख्या दिवसागणिक वाढताना दिसतो आहे. शिवाय अनेक कुटुंबाची वाताहात होत असुन अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. दारूमुळे अनेक तळीरामानी जीव गमावला असुन कित्येक कुटुंबाचा आधारवड कोलमडून पडला असुन अनेक कुटुंब पोरकी झाली असल्याची विदारक चित्रविचीत्र परिस्थिती बघायला मीडत आहे. यावरुन असे लक्षात येते की जिह्यात दारूबंदी ही नावापुरतीच उरली असुन वास्तविकतेला मात्र वेगळेच वळण लागले असल्याचे दिसून येत आहे.

           रक्षाबंधन दिनाचे औचित्य साधून आरमोरी पोलिस स्टेशन येथे मुक्तिपथ शहर व वॉर्ड संघटनेच्या संयुक्त विद्यमाने “राखी विथ खाकी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांनी पोलिस दादांना राखी बांधून शहरातील व ग्रामीण भागातील अवैध दारूविक्री बंद करण्याची ओवाळणी मागितली आहे. सोबतच पोलिस विभागाला निवेदन देऊन शहरासह ग्रामीण भाग दारूमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी सदर उपक्रमात उपस्थित असलेल्या महिलांनी केली आहे. 

            सदर कार्यक्रमात उपस्थित असलेले आरमोरी शहराचे नगराध्यक्ष यांनी शहरातील वार्डा-वार्डातील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी नगरपरिषदेच्या विशेष सभेमध्ये चर्चा करून कारवाई करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. सोबतच पोलिस अधिकाऱ्यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देत महिलांच्या सहकार्याने विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असल्याचे समजते.

              आरमोरी शहर तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात जोपर्यंत अवैधरित्या धंदे करणाऱ्यां दारुमाफीया विरोधात धडक मोहीम राबवली जाणार नाही. तोपर्यंत शहराची प्रतिमा मलिन होतच राहणार यासाठी अवैधरित्या छुपेधंदे करणाऱ्यांचे मुसक्या आवळणे गरजेचे असल्याचे सर्वसामान्य नागरिकांकडुन बोलल्या जात आहे. तद्वतच “राखी विथ खाकी” कार्यक्रमात देण्यात आलेल्या आश्वासनाची पूर्तता आश्वासनकर्ते यांचेकडून होणार की काय? सदर महिलांना रक्षाबंधन ओवाळणी मीडणार की काय? मद्य विक्रेत्ये व दारुचे ठेकेदार यांचेवर कठोर कारवाई होणार की काय? याकडे मुख्यतः महिलावर्ग तथा जनसामान्याचे लक्ष लागले आहे.