मराठा आंदोलकांवरील लाठीमार दुर्दैवी – हर्षवर्धन पाटील… — आरक्षण मागणे हा मराठा समाजाचा हक्क..

 

निरा नरशिंहपुर दि.4

प्रतिनिधी:-बाळासाहेब सुतार,

              मराठा समाजातील युवकांना शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण मिळणे गरजेचे आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (ता.अंबड ) येथे शांततेच्या मार्गाने आमरण उपोषणास बसलेल्या मराठा आंदोलकांवरील पोलिसांच्या लाठीमाराची घटना दु:खद व दुर्दैवी आहे. या दुर्दैवी घटनेस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.

          ते पुढे म्हणाले, मराठा समाज बांधवांचा आरक्षण मागणे हा हक्क आहे. मराठा आरक्षण मागणीसाठी आम्ही सर्वजण मराठा आंदोलनकर्त्यांसोबत आहोत. आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे दि.29 ऑगस्ट पासून मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणास बसलेले आहेत. येथील लाठीमाराची घटना ही चुकीची असून, या घटनेची चौकशी करून शासनाने दोषीवर कडक कारवाई करावी.

         मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी जगाला आदर्श असे एकूण 57 मोर्चे शांततेत काढले आहेत. अनेक मोर्चात आम्ही स्वतःही सहभागी झालो आहोत. मराठा समाजाने आज पर्यंत इतर समाजाला आरक्षण मिळवून देण्यास सहकार्य केले आहे, आता मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे आहे, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.