नको असलेले लोक पुन्हा एकदा आमच्या बोकांडी बसविले : दिलीप मोहिते पाटील… — तालुक्यातील जनता आणि कार्यकर्ते सांगतील तिकडे जाणार : दिलीप मोहिते पाटील… 

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

 पुणे : अजित पवार समर्थक खेड-आळंदी मतदार संघातील आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या मंत्रिपदाला विरोध केला आहे. दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितले की, माझे शरद पवार यांच्यासोबत कधी सलोख्याचे संबंध नव्हते. अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी आम्हाला बोलवले. तोपर्यंत आम्हाला कोणतीही कल्पना नव्हती. एका खोलीत त्यांनी आम्हाला नेले. त्यावेळी सर्वघडामोडी सांगितल्या. यावेळी प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. आम्ही अजित पवार यांना स्पष्टच सांगितले की, आमच्या राजकीय जीवनात सर्वात जास्त त्रास दिलीप वळसे पाटील यांच्याकडून झाला आहे. यामुळे त्यांच्या मंत्रिपदाला विरोध आहे. नको असलेले लोक पुन्हा एकदा आमच्या बोकांडी बसविले. त्यामुळे त्यांना आमचा पाठिंबा नसणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली. त्यानंतर शरद पवार यांच्याकडून अजित पवार यांच्याबरोबर गेलेल्या लोकांना परत आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. अजित पवार यांच्यासोबत नऊ मंत्र्यांचा शपथविधी झाला.त्यात दिलीप वळसे पाटील यांचा समावेश आहे. परंतु आता दिलीप वळसे पाटील यांच्या मंत्रिपदाला अजित पवार समर्थक आमदारांकडून विरोध होत आहे. दिलीप वळसे यांचा मंत्रिपदी समावेश केल्यामुळे आपण तटस्थ असल्याचे त्यांनी सांगितले.

दिलीप वळसे पाटील हे राज्याचे मंत्री म्हणून कधीही वावरले नाही. ते फक्त तालुक्याचे मंत्री म्हणून राहिले. त्याचा तोटा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झाला अन् मलाही झाला. पुन्हा ती वेळ येणार असेल तर मी माझा निर्णय घेणार आहे. तालुक्यातील जनता आणि कार्यकर्ते सांगतील तिकडे जाणार असल्याची भूमिका आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी व्यक्त केली आहे.

    सर्वच आमदार होते उपस्थित

अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीला सर्वच आमदार उपस्थित होते. त्यामुळे सर्व पक्षच भाजपसोबत जातोय, अशी भावना आमची झाली. पक्ष जाणार असेल तर त्याला विरोध करण्याची गरज नाही, असे मला वाटल्याचे दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितले. मलाही शपथ विधीला बोलावले होते. अजित पवार हे माझ्या अनेक सुख, दुःखात सहभागी झाले होते. यामुळे त्यांच्या सुखाचा प्रसंग होता, त्यामुळे मी राजभवनात शपथ विधीला उपस्थित राहिलो.