डॉ.जगदीश वेन्नम
संपादक
गडचिरोली,(जिमाका)दि.03:राज्यात दि.३ जुलै २०२३ पर्यंत १४०.९मिमी पाऊस पडलेला असून तो राज्याच्या ३ जुलै पर्यंतच्या सरासरी पर्जन्यमानाच्या (२३९.६ मिमी) ५८.८% प्रत्यक्ष पाऊस पडलेला आहे .
हंगामातील सरासरी पेरणीचे क्षेत्र १४२ लाख हेक्टर असून दि.३.०७.२०२३ अखेर प्रत्यक्षात ९.४६ लाख हेक्टर (७ टक्के) पेरणी झालेली आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार या आठवड्यात पाऊस पडल्यास राज्यात पेरणीच्या कामास वेग येईल.
खरीप हंगाम २०२३ करीता १९.२१लाख क्विं.बियाणे गरजेच्या तुलनेत सद्यस्थितीत प्राथमिक अंदाजानुसार २१.७८ लाख क्विं.बियाणे उपलब्ध आहे. राज्यात १५,९२,४६६ क्विंटल (८२%) बियाणे पुरवठा झालेला आहे. त्यामुळे राज्यात खरीप हंगामा करिता आवश्यक बियाणे साठा उपलब्ध आहे.
खरीप हंगाम २०२३ करिता राज्यास ४३.१३ लाख मे. टन खतांच्या पुरवठ्याचे नियोजन मंजूर असून आतापर्यंत ४४.१२ लाख मे. टन खतांचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यापैकी १६.५३लाख मे.टन खतांची विक्री झालेली असून सद्यस्थितीत राज्यात २७.५९लाख मे. टन खतांचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार खतांची खरेदी करावी.
दिनांक २३ जून २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यामध्ये एक रुपयात पिक विमा अर्थात “सर्व समावेशक पीक विमा” योजना राबवण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. त्याचा राज्यातील शेतकऱ्यांना लाभ होईल.
दि.२७ जून , २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यात नैसर्गिक / सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनला सन २०२२-२३ ते सन २०२७-२८ या कालावधी करिता मुदतवाढ देऊन डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन या नावाने सदर योजनेची व्याप्ती दुसऱ्या टप्प्यात राज्यभर वाढवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे . सदरहू योजनेकरीता राज्य व केंद्र पुरस्कृत योजनेत रु.१९२०.९९कोटीच्या आर्थिक तरतूदीस मान्यता दिलेली आहे.
राज्यामध्ये आवश्यकतेनुसार बियाणे आणि खतांचा साठा उपलब्ध असल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्यानंतर पेरणी करावी असे आवाहन राज्याचे आयुक्त कृषी सुनील चव्हाण यांनी राज्यातील शेतकऱ्यांना केलेले आहे.