वैरागड येथे सर्पमित्रांनी दिले दुर्मिळ निमविषारी मांजऱ्या जातीच्या सापाला जीवनदान. – साप पटवारी कार्यालयाच्या बाथरूम मध्ये होता. – साप दुर्मिळ आणि जवळपास ०५ फूट लांबीचा होता. – सर्पमित्रांनी वनविभाग आणि वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्था आरमोरी यांना माहिती देऊन सापाला सुरक्षित जंगलात सोडले.

प्रतिनिधी//प्रलय सहारे

        वैरागड : – येथील पटवारी कार्यालयात असलेल्या दुर्मिळ अंदाजे ०५ फूट निमविषारी मांजऱ्या सापाला आज दि. ०३ एप्रिल रोजी दुपारी ०३ वाजता सर्पमित्र प्रलय सहारे आणि संजय उर्फ कादर बांबोळे यांनी सुरक्षित पकडून जीवनदान दिले.     

                            

      आरमोरी ररस्त्यावर असलेल्या राजीव भवनमध्ये पटवारी कार्यालय आणि सेतू केंद्र आहे. आज पटवारी कार्यालयातील बाथरूम मध्ये साप असल्याचे तेथील कर्मचाऱ्यांना आढळले. कोतवाल जितेंद्र कांबळे आणि सामाजिक कार्यकर्ते संजय खंडारकर यांनी साप असल्याची माहिती सर्पमित्र प्रलय सहारे यांना दिली. कार्यालयात गेले असता बाथरूमच्या खिडकीवर गुंडाळी मारून साप असल्याचे दिसले. साप गेरू रंगाचा जवळपास ०५ फूट लांबीचा आणि दुर्मिळ मांजऱ्या असल्याचे समजले. कार्यालयातील कर्मचारी आणि नागरिकांचा जीव टांगणीला आला असता त्यांना धीर देऊन सर्पमित्रांनी सापाला सुरक्षित पकडले. सापाला पकडताच उपस्थितांनी सर्पमित्रांचे आभार मानले.

      याबाबत सर्पमित्रांनी येथील वनविभाग आणि वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्था आरमोरी यांना माहिती देऊन सापाला वन अधिवासात सोडण्यात आले. साप पकडतांना कोतवाल जितेंद्र कांबळे, सामाजिक कार्यकर्ते संजय खंडारकर, सेतू केंद्र चालक, एकनाथ गोटेफोडे, प्रियंका गेडाम, नरेश तागडे, सौरव बनकर, महेश गेडाम, विक्की मेहरे तसेच कार्यालयातील कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.