दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या विमान अपघाती निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या अचानक जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी असल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांपासून कार्यकर्त्यांपर्यंत व्यक्त होत आहे. त्यांच्या लोकहितकारी कार्याची आठवण म्हणून धोनोरे गावातील ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण शोकसभा आयोजित करण्यात आली.
या शोकसभेत प्रा.डॉ.हेमकांत गावडे, आदर्श शिक्षक पांडुरंग गावडे, माजी केंद्रप्रमुख उल्हास रोकडे, ॲड.संदीप मच्छिंद्र गावडे, कामगार नेते धिरज साबळे, भानुदास गावडे, युवासेना उपजिल्हा प्रमुख सचिन गावडे, रोहिदास गावडे आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी ॲड.संदीप गावडे यांनी स्व.अजितदादा हे सर्वसामान्यांचा नेता असून गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी ते सदैव झटत राहिले. कठोर निर्णय घेण्याची क्षमता आणि प्रशासकीय कौशल्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान दिले, अशा शब्दांत त्यांनी आदरांजली वाहिली.
कार्यक्रमाची प्रस्तावना सुनील बाबासाहेब गावडे यांनी केली तर आभार प्रदर्शन खरेदी-विक्री संघाचे माजी संचालक पांडुरंग गावडे यांनी केले. या शोकसभेस सरपंच संतोष गावडे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि धोनोरे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्व. अजितदादा पवार यांचे विचार आणि कार्य सदैव प्रेरणादायी राहतील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.



