Home Maharashtra उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन…

 बाळासाहेब सुतार 

निरा नरसिंहपूर प्रतिनिधी

         उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी (२ फेब्रुवारी) कराड येथील प्रिती संगमावर महाराष्ट्राचे शिल्पकार, पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच कराडमध्ये येत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केले.

           दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आणि स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचे नातं अत्यंत जिव्हाळ्याचे होते. ते वारंवार कराडमध्ये यशवंतराव चव्हाण त्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन करत होते. त्यांची आठवण यावेळी उपस्थितांना झाली.

            यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, खासदार सुनील तटकरे, खासदार नितीन पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

शपथविधीनंतर सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?

         दरम्यान, शपथविधीनंतर सुनेत्रा पवार म्हणाल्या की, दादांच्या अकाली निधनाने केवळ माझ्या वैयक्तिक आयुष्यावरच नाही, तर महाराष्ट्राच्या हृदयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

           तथापि, त्यांनी मला दिलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रती असलेली प्रामाणिक बांधिलकी हेच माझे खरे आधारस्तंभ आहेत त्यांनी स्पष्ट केले की, अजित दादांनी आपले आयुष्य शेतकरी, कष्टकरी, महिला आणि तरुणांना अस्तित्वाचा मंत्र देण्यासाठी वेचले.

          हा वारसा पुढे नेताना मी शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारसरणीवर अढळ निष्ठा ठेवून काम करेन, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानताना त्या म्हणाल्या की, या कठीण काळात महाराष्ट्रातील जनतेने दिलेले प्रेम, विश्वास आणि पाठिंबा हीच माझी सर्वात मोठी शक्ती आहे. तुमच्या विश्वासाच्या जोरावर मी दादांचे विचार जिवंत ठेवून नवीन आशा आणि ऊर्जेने पुढे जात राहीन.

मी माझ्या पूर्ण क्षमतेने काम करेन…

           पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मविकसित भारत २०४७फ ला बळकटी देण्यासाठी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सरकार महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सज्ज आहे.

           नवीन ऊर्जेने आणि आशेने, माझ्यावर टाकलेल्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी मी माझ्या पूर्ण क्षमतेने काम करेन. सुनेत्रा पवार यांच्याकडे उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण या विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.