Home Political आळंदी नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजप प्रभारीपदी प्रदीप कंद यांची निवड…

आळंदी नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजप प्रभारीपदी प्रदीप कंद यांची निवड…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : आगामी आळंदी नगरपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक हालचालींना वेग दिला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांची आळंदी नगरपरिषद निवडणूक प्रभारीपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा होताच आळंदी व परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

       भाजपच्या निवडणूक रणनितीचे नियोजन, उमेदवारांची निवड, तसेच प्रचार मोहिमेची आखणी या सर्व बाबींचे मार्गदर्शन प्रदीप कंद यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. जिल्ह्यातील संघटन कार्यात त्यांनी दाखवलेले नेतृत्व आणि समन्वय कौशल्य लक्षात घेऊन ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

        स्थानिक स्तरावर भाजपला बळकट करण्यासाठी, तसेच आळंदी नगरपरिषदेवर भगवा फडकविण्याच्या उद्दिष्टाने पक्षाची यंत्रणा सज्ज होत असल्याची माहिती भाजपाचे पुणे जिल्हा सचिव किरण येळवंडे यांनी दिली. येत्या काही दिवसांत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होणार असून, निवडणुकीच्या तयारीला गती दिली जाणार आहे.

        भाजपचे ओबीसी आघाडीचे अध्यक्ष संकेत वाघमारे म्हणाले, “प्रदीप कंद यांच्या नेतृत्वाखाली संघटन अधिक सक्षम होईल. आळंदीतील विकासाच्या दृष्टीने भाजपच सक्षम पर्याय आहे.”