युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
गेल्या महिन्याभरापासून उष्णतेच्या झळा अधिक तीव्र झाल्या असल्याने उष्णतेचा पारा 45 अंशाच्या पलीकडे गेला असून पिण्याच्या पाण्याची व वापराच्या पाण्याची अधिक गरज दर्यापूर शहरवासियांना भासत आहे. तर शहरात अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने अनेक संकटांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
दर्यापूर शहरातील पाटीलपुरा भागात गेल्या महिनाभरापासून अति अल्प प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे पाणी भरणे होत नाही. तर महिलांना भर उन्हात घरगुती वापराच्या पाण्यासाठी नदीकडे धाव घ्यावी लागत आहे. जिवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत अनेकदा संपर्क साधला असताना त्यांच्यासोबत संपर्क होऊ शकला नाही.
दर्यापूर जिवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी गेल्या 20 ते 25 वर्षापासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसले असून त्यांच्यामध्ये काम करण्याची तळमळता नसल्याने अनेक प्रश्न थंडबस्त्यात पडून आहेत. लोकप्रतिनिधी सोबत आपले मिळते जुळते करून नागरिकांना वाऱ्यावर सोडवण्यामध्ये हे अधिकारी माहीर आहेत.
अनेक नागरिक पाण्याचा भरणा नियमित करत असताना सुद्धा पाहिजे त्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याने दर्यापूर येथील नागरिकांनी जिवन प्राधिकरण विभागावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे शहानुर प्रकल्पात अद्यापही भरमसाठ पाणीपुरवठा शिल्लक असून सुद्धा शहरात पाणीपुरवठा होत नसल्याने येथील अधिकारी वर्गावर व प्रभागात पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यावर ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस शहर अध्यक्ष आतिश शिरभाते यांनी केली आहे.



