इंद्रायणी नदीच्या प्रदुषित पाण्यामुळे वारकऱ्यांचे आरोग्य धोक्यात… — पाच दिवसांवर आलेल्या कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर इंद्रायणी पुन्हा फेसाळली…

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

आळंदी : महाराष्ट्रातील प्रमुख तिर्थक्षेत्र आळंदीतील इंद्रायणी नदी वारकऱ्यांसाठी पवित्र मानली जात आहे. त्यामुळे लाखो भाविक आळंदीत इंद्रायणी नदीत कार्तिकी वारीत स्नान करत असतात. पाच दिवसांवर आलेला संजीवन समाधी सोहळा, आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला या इंद्रायणीच्या घाटावर लाखो वारकरी येत असतात.

           पुन्हा एकदा इंद्रायणी नदीत शुक्रवारी सकाळपासून केमिकल युक्त फेसचे पाणी सोडले जात असल्याने तेथील स्थानिक वारकरी व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो.

       कार्तिकी वारीत वारकऱ्यांसाठी या नदीचं पाणी तीर्थासमान आहे. अनेक वारकरी या नदीत स्थान करतात शिवाय तीर्थ म्हणून नदीचं पाणी पितात. त्यामुळे ही नदी स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे.

            नदीतील प्रदूषण वाढत राहिलं तर अनेक वारकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो शिवाय मोठ्या प्रमाणात त्वचा रोग होण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. त्यामुळे स्थानिक वारकरी, ग्रामस्थ व सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून नदी स्वच्छ ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे.