दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुरंदवडे – आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे पुरंदवडे येथे भव्य गोल रिंगण भक्तिभावाने पार पडले. टाळ-मृदंगाचा गगनभेदी गजर, “माऊली-माऊली”चा अखंड नामस्मरणाचा जयघोष, पालखीभोवती फडफडणाऱ्या भगव्या पताका, ढगाळ आभाळ व अलोट गर्दी अशा वातावरणात माऊलींच्या अश्वाने रिंगणासाठी फेरी मारली आणि संपूर्ण परिसर हरिभक्तिमय झाला.
वारीतील हे यंदाचे पहिले उभे गोल रिंगण असल्याने वारकऱ्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. नातेपुते येथे पहाटे सोहळाप्रमुख डॉ.भावार्थ देखणे यांच्या हस्ते महापूजनानंतर सकाळी सहा वाजता पालखी सोहळा मार्गस्थ झाला. साडेनऊच्या सुमारास मांडवी ओढ्याजवळ पालखीने विश्रांती घेतली. दिंड्यांनी तेथे भोजन घेतल्यानंतर दुपारी साडेबारा वाजता रथ माळशिरसच्या दिशेने मार्गस्थ झाला.
“आम्ही दैवाचे, विठुरायाचे दास” असा अभिमान व्यक्त करत वारकऱ्यांनी वाटचाल सुरू ठेवली. दुपारी दोनच्या सुमारास पुरंदवडेच्या माळरानावर रथ पोहोचताच रिंगणाला सुरुवात झाली. हजारो भाविक या दिव्य क्षणाला साक्षीदार होण्यासाठी गर्दी करून उभे होते. रिंगणासाठी अश्वासह विविध दिंड्या क्रमशः प्रवेश करू लागल्या. त्यानंतर माऊलींची पालखी मंडपात विराजमान झाली.
रिंगणात प्रमुख मानकरी ऊर्जितसिंह शितोळे सरकार, सोहळामालक राजाभाऊ आरफळकर, सोहळाप्रमुख डॉ.भावार्थ देखणे, प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज कबीरबुवा, पुरुषोत्तम महाराज पाटील, ॲड.रोहीणी पवार, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आणि संस्थानचे सेवेकरी, चोपदार व इतर मान्यवर उपस्थित होते.
रिंगणाचे शिखर म्हणजे अश्वांची धाव. भोपळे दिंडीच्या मानकऱ्यांनी रिंगणाला तीन फेऱ्या दिल्यानंतर स्वाराचा अश्व आणि माऊलींचा अश्व वेगाने दौडले. भक्तांनी टाळ्यांच्या कडकडाटात हे अद्भुत दृश्य अनुभवले. रिंगण पूर्ण होताच अश्वांच्या टापेखालची पवित्र माती कपाळी लावण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली.
यानंतर वारकऱ्यांनी पारंपरिक खेळांमधून उत्सवाचा आनंद द्विगुणित केला. पावली, फुगड्या, खो-खो, हुतूतू, मनोरे अशा पारंपरिक खेळांत सहभागी होत भक्तिरसात रंगले. रिंगण सोहळा अत्यंत उत्साहात आणि शिस्तीत पार पडला. त्यानंतर माऊलींची पालखी माळशिरस मुक्कामी मार्गस्थ झाली. हा सोहळा म्हणजे केवळ परंपरेचा वारसा नाही, तर भक्तिभाव, एकता आणि समाजात अध्यात्मिक ऊर्जा निर्माण करणारा अविस्मरणीय अनुभव ठरला.



