दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : संगीत, नृत्य आणि नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करणाऱ्या संगीत नाटक अकादमीने २०२४ आणि २०२५ या वर्षांसाठी अकादमी पुरस्कारांची घोषणा केली असून, आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त डॉ.भावार्थ रामचंद्र देखणे यांना प्रतिष्ठेचा ‘उस्ताद बिस्मिल्लाह खान युवा पुरस्कार – २०२४’ जाहीर झाला आहे.
महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या ‘भारुड’ या लोककलेच्या संवर्धन, जतन आणि प्रसारासाठी डॉ. देखणे यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन, सांस्कृतिक जतन आणि पारंपरिक कलाविष्कार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.
भारतीय लोककला, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी दिला जाणारा उस्ताद बिस्मिल्लाह खान युवा पुरस्कार हा देशातील युवा कलाकारांसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. या पुरस्कारामध्ये २५ हजार रुपयांची रोख रक्कम, ताम्रपत्र आणि वस्त्र यांचा समावेश आहे.
संगीत नाटक अकादमीच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या फेलोशिप आणि अकादमी पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष समारंभात करण्यात येणार आहे.



