दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरातील स्वयंसेवक विशाल वारूळे याच्या संशयास्पद प्रकारानंतर संस्थान कमिटीने कठोर भूमिका घेत मंदिर प्रशासनात व्यापक बदलांची घोषणा केली आहे. सीसीटीव्ही तपासणीत कॅश विभागातून हार, फुले व प्लास्टिकचे पोते नेत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर विशाल वारूळे याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे विश्वस्त ॲड.राजेंद्र उमाप यांनी सांगितले.
संस्थानच्या सीसीटीव्ही विभागातील कर्मचारी श्रीकांत लवांदे यांनी मागील आठवड्याचे फुटेज तपासत असताना १२, १३ व १६ मे रोजी वारूळे याच्या हालचाली संशयास्पद आढळल्या. त्यानंतर संस्थान प्रशासनाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमा नरके यांच्याशी संपर्क साधून पुढील कारवाई केली.
या घटनेनंतर अन्नदान व कॅश विभागात स्वयंसेवकांना बंदी घालण्यात आली असून कर्मचारी, सुरक्षा रक्षक व सेवेकऱ्यांसाठी गणवेश व ओळखपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. मंदिरात प्रवेश व निर्गमनासाठी स्वतंत्र तपासणी व्यवस्था लागू करण्यात आली असून पिशव्या आणण्यासही मनाई करण्यात आली आहे.
दानपेटी उघडण्यापासून रोकड मोजणीपर्यंत संपूर्ण प्रक्रिया आता सीसीटीव्ही व व्हिडिओ शूटिंगच्या देखरेखीखाली होणार आहे. फेस आयडी, थम्ब आयडी आणि आरएफआयडी प्रणालीसह कॅश विभाग पूर्णतः बंदिस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मंदिर प्रशासन अधिक पारदर्शक करण्यासाठी अत्याधुनिक ईआरपी सॉफ्टवेअर व एआय तंत्रज्ञान लागू करण्याची प्रक्रियाही सुरू आहे.
दरम्यान, २५ मे रोजी झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत प्रशासन सहव्यवस्थापक सागर वाळके, रोखपाल महेश गोखले, अन्नदान कक्षाचे पांडुरंग कुटे तसेच प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांच्याकडून खुलासा व अहवाल मागविण्यात आला आहे. तसेच रोखपाल महेश गोखले यांची बदली अन्नदान कक्षात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
यावेळी प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, पालखी सोहळा प्रमुख राजेंद्र उमाप, पुरुषोत्तम महाराज पाटील, चैतन्य महाराज लोंढे तसेच ग्रामस्थ प्रतिनिधी म्हणून डि.डि.भोसले, नंदकुमार कुऱ्हाडे, विलास घुंडरे, रामभाऊ भोसले, संजय घुंडरे आणि सचिन गिलबिले उपस्थित होते. विशाल वारूळे प्रकरणातील पोलिस तपासाचा पाठपुरावा सुरू असून दोषींना पाठीशी घातले जाणार नाही, अशी भूमिका संस्थान प्रशासनाने स्पष्ट केली आहे.



