राकेश चव्हाण
तालुका प्रतिनिधी कुरखेडा
लैंगिक अत्याचार,छेडछाड,अपहरण आणि बालकांवरील वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर मुलांना ‘गुड टच-बॅड टच’ची माहिती देणे ही काळाची गरज आहे.“मुलं म्हणजे देवाघरची फुलं” असे आपण म्हणतो,मात्र या फुलांना सुरक्षित वातावरण मिळणे आवश्यक आहे.
आज समाजात घडणाऱ्या बालकांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे पालक आणि समाजात चिंता वाढली आहे.अशा परिस्थितीत मुलांना स्वसंरक्षणाचे शिक्षण,योग्य मार्गदर्शन आणि शाळांमधून लैंगिक शिक्षण देणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
‘गुड टच-बॅड टच’ म्हणजे सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श यातील फरक मुलांना समजावून सांगणे ही बालसुरक्षेची प्राथमिक पायरी आहे.नर्सरी,अंगणवाडी ते इयत्ता पहिली-दुसरीपर्यंतच्या मुलांना याबाबत पूर्वकल्पना देणे गरजेचे आहे.
पालकांनी मुलांना आपल्या शरीराविषयी माहिती देऊन कोणालाही विनाकारण स्पर्श करण्याचा अधिकार नसल्याचे समजावून सांगावे,असेही त्यांनी नमूद केले.
मुलांना कोणताही अनुचित स्पर्श झाल्यास त्वरित “नाही” म्हणण्याचे धाडस,विश्वासातील व्यक्तीला माहिती देणे आणि संशयास्पद प्रसंगांपासून दूर राहणे शिकविणे आवश्यक आहे.
काही वेळा ओळखीची व्यक्तीच गोड बोलून मुलांचा विश्वास संपादन करते, त्यामुळे मुलांनी योग्य-अयोग्य स्पर्श ओळखून स्पष्ट नकार देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शाळांमध्ये ‘गुड टच-बॅड टच’ विषयावर सामूहिक समुपदेशन,शिक्षकांचे निरीक्षण आणि नियमित जनजागृती उपक्रम राबविण्याची गरज आहे.
शाळा,स्कूल बस,शेजार किंवा सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या संशयास्पद प्रकारांकडे पालक आणि शाळा व्यवस्थापनाने गांभीर्याने लक्ष द्यावे..
बालकांचे संरक्षण ही केवळ सरकारी जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची नैतिक जबाबदारी आहे.सुरक्षित बालपणासाठी ‘गुड टच-बॅड टच’ ही माहिती घराघरांत पोहोचवून ती प्रभावी सामाजिक जनजागृती चळवळ बनविण्याची गरज आहे.



