राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
गडचिरोली जिल्ह्यातील(कुरखेडा तालुका) मौजा जांभुळखेडा येथे १ मे २०१९ रोजी झालेल्या भ्याड नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना आज भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. “जन संघर्ष समिती”च्या वतीने व जांभुळखेडा ग्राम वासियां तर्फे या स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शहीद जवानांच्या स्मृतीस्थळावर तिरंग्याच्या रंगांनी सजवून आकर्षक स्मारक उभारण्यात आले होते. परिसरात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी फुले अर्पण करून शहीद जवानांना अभिवादन केले.
कार्यक्रमात सहभागी जांभुळ खेडा प्रशासक राधा हलामी,सामजिक कार्यकर्ते गणपत बन्सोड,देवनाथ नैताम,ग्राम अधिकारी राठोड,पो.पा.हिरालाल धोंडणे सह सहभागी झालेल्यांनी शहीदांच्या बलिदानाची आठवण करून देत त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसेच देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांचे योगदान कधीही विसरता येणार नाही, असे मत व्यक्त करण्यात आले.
या प्रसंगी नागरिकांनी देशभक्तीची भावना जागृत ठेवण्याचा संकल्प केला. अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीला शहीद जवानांच्या त्यागाची जाणीव होऊन राष्ट्रप्रेम अधिक दृढ होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.



