दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादिका
पुणे :- विद्यानगर येथील चलवादी शिक्षण संस्थेच्या पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये महाराष्ट्र दिन,कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.विशेष म्हणजे,श्रमाचा गौरव करीत शाळेतील महिला कामगार गीताताई सनदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला.
ध्वजारोहणानंतर तथागत गौतम बुद्ध,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज आणि संस्थेचे संस्थापक स्वर्गीय मरिअप्पा चलवादी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना घेण्यात आली.
या सोहळ्यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ.हुलगेश चलवादी आणि उपाध्यक्षा अँड.रेणुका चलवादी (शिर्के) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.इयत्ता दहावीच्या शंभर टक्के निकालाची शाळेची परंपरा कायम राखण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या शिक्षकांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाल आणि ‘भारतीय संविधानाची’ प्रत देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.हुलगेश चलवादी म्हणाले की, “शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे.कामगारांच्या कष्टांमुळेच देशाची प्रगती शक्य होते,तर भगवान बुद्धांनी दिलेला समतेचा आणि शांततेचा संदेश आजच्या काळात अधिक महत्त्वाचा आहे.केवळ पुस्तकी ज्ञान न घेता विद्यार्थ्यांनी संविधानातील मूल्यांचे जतन करावे. ज्याप्रमाणे महाराष्ट्र ही संतांची आणि शौर्याची भूमी आहे,त्याचप्रमाणे आपल्या कर्तृत्वातून देशाला नवी दिशा देण्याची जबाबदारी नव्या पिढीवर आहे.
शाळेतील शंभर टक्के निकालाची परंपरा ही येथील शिक्षकांच्या निष्ठेचे प्रतीक असून, भविष्यातही आपण अशाच प्रकारे ज्ञानाच्या माध्यमातून सक्षम समाज घडवूया,” असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या महाराष्ट्र गीत, समूहगीताने आणि ‘मी जिजाई बोलते’ या एकपात्री प्रयोगाने उपस्थितांची मने जिंकली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य स्मिता लोंढे,सायली शिंदे,ज्योती सचदेव,जयश्री कदम,अश्विनी मोहिते व बिना कदम यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्व शिक्षक,कर्मचारी,पालक व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



