शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
अमेरिका भारत देशात शेतकरी विरोधी झालेला शेतकरी करार रद्द करावा यासाठी नागभिड विधानसभा युवक काँग्रेस प्रशांत धनराज डवले यांच्यासह राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी चिमूर तहसीलचे तहसीलदार श्रिधर राजमाने यांच्या मार्फत निवेदन दिले आहे.
भारत अमेरिका व्यापार करार हा “शेतकरी विरोधी” करार असल्याने,तो करार रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांचा आवाज निवेदनाद्वारे भारत सरकारपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.
निवेदनात म्हटले आहे की,केंद्र सरकारने प्रस्तावित केलेला भारत-अमेरिका व्यापार करार हा देशातील शेतकरी,ग्रामीण अर्थव्यवस्था आणि अन्नसुरक्षेस अत्यंत घातक ठरणारा आहे.
या करारामुळे अमेरिकेतील कृषी उत्पादनांना ०% आयात शुल्क घेतले जाणार असून,त्यामुळे स्वस्त विदेशी माल भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात येईल.
परिणामी,भारतीय शेतकऱ्यांच्या उत्पादनांच्या किमती कोसळतील व त्यांना योग्य बाजारभाव मिळणार नाही.भारतामध्ये बहुतांश शेतकरी हे लहान व अल्पभूधारक आहेत,ज्यांच्याकडे पुरेशी सरकारी मदत नाही किंवा आधुनिक साधने नाहीत.
त्यांना अमेरिकेतील मोठ्या व अनुदानित शेतकऱ्यांशी स्पर्धा करणे शक्य नाही.हा करार शेतकऱ्यांसाठी असमान स्पर्धा निर्माण करतो.तसेच,या करारामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवस्था व MSP (किमान आधारभूत किंमत) यांची उपयुक्तता कमी होईल.
व्यापारी स्थानिक शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याऐवजी आयात केलेल्या उत्पादनांना प्राधान्य देतील,ज्यामुळे स्थानिक बाजारपेठेचे अस्तित्व धोक्यात येईल.
दुग्धव्यवसायावरही या कराराचा गंभीर परिणाम होणार आहे.स्वस्त आयातीत दूध किंवा दुग्धजन्य पदार्थामुळे गावपातळीवरील दुग्ध उत्पादकांचे उत्पन्न कोसळेल व ग्रामीण अर्थव्यवस्था डगमगेल.या करारामुळे कृषी क्षेत्रावर मोठ्या खाजगी कंपन्यांचे वर्चस्व निर्माण होण्याचा धोका आहे,ज्यामुळे भारतीय शेतकरी स्वतःच्या जमिनीवर मजूर बनण्याची वेळ येऊ शकते.
यामुळे सर्व बाबींचा विचार करता,हा करार “शेतकरी विरोधी असून देशाच्या आत्मनिर्भरतेस बाधा आणणारा आहे.
म्हणून आपणास नम्र विनंती आहे की,सदर निवेदन आपल्या स्तरावरून पुढे पाठवून हा “शेतकरी विरोधी” करार रद्द करण्यासाठीचा शेतकऱ्यांचा आवाज भारत सरकारपर्यंत पोहोचवण्यात यावा अशी विनंती तहसीलदार श्रिधर राजमाने यांना राष्ट्रीय काँग्रेस पक्ष पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदन देताना चिमूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रशांत डवले,काँग्रेसचे जेष्ठ नेते जुनेद खान,श्रिकांत गेडाम,इरफान पठाण,कमलेश बांबोडे,shafey शेख,सुरज चौधरी,अमोल मालके,निखिल वारजूकर यांच्यासह आदीं पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



