Home Crime गांजाच्या नशेचा विळखा,”निर्जन ठिकाणी उघडपणे सेवन…

गांजाच्या नशेचा विळखा,”निर्जन ठिकाणी उघडपणे सेवन…

      राकेश चव्हाण

तालुका प्रतिनिधी कुरखेडा…

        शहरात सध्या गांजाच्या वाढत्या व्यसनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.विशेषतः महाविद्यालयीन युवकांमध्ये गांजाचे सेवन झपाट्याने वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

        शहरालगतची निर्जन ठिकाणे,नदी परिसर,तसेच काही रोड परिसर,जि.प.शाळा ग्राउंड,बस स्थानक परिसर,हनुमान मंदीर जवळील तलावची पाळ,बाय पास रोड,नाका परिसर हे नशेबाजांचे ‘हॉटस्पॉट’ बनले आहेत.

          सायंकाळच्या सुमारास या ठिकाणी युवकांचे टोळके जमून उघडपणे गांजा ओढताना दिसतात.यामुळे शहरातील शैक्षणिक व सामाजिक वातावरणावर विपरीत परिणाम होत असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

        सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे युवकांमध्ये वाढलेली उत्सुकता आणि चुकीचे आकर्षण ही यामागील प्रमुख कारणे असल्याचे जाणकारांचे मत आहे.

       वरिल निर्जन जागांवर ४-५ जणांचे गट तयार करून सिगारेटमध्ये गांजा भरून सेवन केले जात असल्याचे दिसून येते.मात्र,या प्रकाराकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

         विद्यार्थीदशेत व्यसनाची लागण धोकादायक तज्ञांच्या मते,विद्यार्थीदशेत लागलेले व्यसन भविष्यासाठी घातक ठरू शकते.शिक्षणाच्या वयातच युवक व्यसनाधीन होत असतील,तर समाजाचे भविष्य धोक्यात येऊ शकते,अशी भीती व्यक्त केली जात आहे.

        गांजाच्या पुरवठा साखळीचा शोध घेऊन ती थांबवणे,निर्जन व संशयित ठिकाण येथे पोलिस विभागाने गस्त घालुन या वाढत्या व्यसनाधीनतेवर आळा घालावा,अशी मागणी होत आहे.