Home Maharashtra ओटीपीशिवाय गॅस बुकिंग नाही, गृहिणींची गैरसोय, ग्राहक त्रस्त…

ओटीपीशिवाय गॅस बुकिंग नाही, गृहिणींची गैरसोय, ग्राहक त्रस्त…

    राकेश चव्हाण 

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

          घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगसाठी आता ओटीपी (OTP) अनिवार्य करण्यात आल्याने अनेक ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील गृहिणींना या नव्या प्रक्रियेचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे.

         गॅस बुकिंगसाठी मोबाईलवर ओटीपी येणे आवश्यक आहे. मात्र, नेटवर्क समस्या, मोबाईल वापरातील अडचणी किंवा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक उपलब्ध नसल्यामुळे अनेकांना बुकिंग करता येत नाही. परिणामी, वेळेवर गॅस मिळण्यात विलंब होत असून दैनंदिन स्वयंपाकाचे नियोजन विस्कळीत होत आहे.

          काही ग्राहकांनी सांगितले की, “आमच्याकडे साधा मोबाईल आहे किंवा नेटवर्क नीट लागत नाही. ओटीपी येत नाही, त्यामुळे गॅस बुकिंग करणे कठीण झाले आहे.” तसेच वृद्ध नागरिक व अशिक्षित महिलांना ही प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची वाटत आहे.

          याशिवाय, गॅस एजन्सीचे दिलेले पर्यायी क्रमांक किंवा अॅपद्वारे बुकिंग करण्याची सुविधा असली तरी त्यासाठीही तांत्रिक ज्ञान आवश्यक असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना त्याचा पुरेसा लाभ मिळत नाही.

           ग्राहकांनी प्रशासन व गॅस कंपन्यांकडे मागणी केली आहे की, ओटीपीशिवाय बुकिंगसाठी पर्यायी सोपी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. तसेच ग्रामीण भागात जनजागृती करून ग्राहकांना योग्य मार्गदर्शन करावे, जेणेकरून त्यांना होणारा त्रास कमी होईल.

           दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.