ऋषी सहारे
संपादक
आरमोरी :- कोरोना काळात संपूर्ण राज्य संकटात सापडले असताना, आपल्या जिवाची पर्वा न करता राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, अर्धवेळ स्त्री परिचर आणि आशा वर्कर यांनी प्रामाणिकपणे काम केले. आधीच अत्यल्प मानधनावर काम करणाऱ्या या महिलांनी मोठी जबाबदारी पार पाडली.
या कामाच्या बदल्यात राज्य शासनाने प्रति महिना 1000 रुपये प्रमाणे कोरोना भत्ता देण्याचा आदेश काढला होता. मात्र, हा भत्ता केवळ मोजक्या महिलांनाच मिळाला असून, पाच वर्षे उलटूनही जिल्ह्यातील बहुसंख्य अंगणवाडी सेविका, मदतनीस, आणि अर्धवेळ स्त्री परिचर महिला या भत्त्यापासून वंचित आहेत.
या प्रलंबित मागणीसाठी दिनांक 13 एप्रिल रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर सुमारे 2000 महिलांचे भव्य आंदोलन पुकारण्यात आले आहे.
या आंदोलनात संघटनेचे नेते कॉ.रमेशचंद्र दहिवडे, माकपाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ.अरुण लाटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य कॉ.अमोल मारकवार, अरुण भेलके तसेच जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी सेविका, मदतनीस, आणि अर्धवेळ स्त्री परिचर महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.


