शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
चिमूर – भीमाची लेकर ऑर्गनायझेशन नागपुर महाराष्ट्र तर्फे क्रांतीसूर्य समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त ऑनलाईन अभिवादन व व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.भीमाच्या लेकरांकडून सदर कार्यक्रम दि ११ एप्रिल रोजी उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.वर्षा मेश्राम (भंडारा) या होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करत अभिवादन करुन त्यांच्या सामाजिक परिवर्तनाती योगदानावर प्रकाश टाकण्यात आला.
त्यांनी समाजातील अन्याय,अंधश्रद्धा आणि जातीय भेदभावाविरुद्ध आयुष्यभर संघर्ष केला.स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्याने मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली,याचीही यावेळी आठवण करून देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. जया वागदे, तळोदी बाळापुर चंद्रपूर यांनी केले.त्यांनी संस्थेच्या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली व येणाऱ्या काळात संस्था महापुरुषांचे कार्य व विचारांचा प्रचार आणि प्रसार प्रभावीपणे समाजात करणार आहे याबद्दल माहिती दिली.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.रामचंद्र जे.गायकवाड प्राचार्य,कोकण ज्ञानपीठ कॉलेज,कर्जत,जि.रायगड यांचा परिचय डॉ.गुरुनाथ गायकवाड यांनी करून दिला.
मुख्य वक्ते डॉ.रामचंद्र गायकवाड यांनी महात्मा फुले यांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता स्पष्ट करत सामाजिक समतेचा संदेश दिला.त्यानंतर डॉ.ज्योत्स्ना वाकोडे नागपूर,प्रा.सुरज शेंडे (गडचिरोली), डॉ.सुरेश फुलकर (राळेगाव-यवतमाळ) आणि डॉ. शंकर धांडे (परळी-वैजनाथ, बीड) यांनीही आपल्या मनोगतातून फुले यांच्या कार्याचा गौरव केला.
अध्यक्षीय भाषणात डॉ.वर्षा मेश्राम यांनी महात्मा फुले यांच्या विचारांचे अनुकरण करून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला उपस्थित भीमाचे लेकरे ऑर्गनायझेशनचे नागपूर महाराष्ट्र चे अध्यक्ष डॉ. शदिलीप पाटील,सचिव डॉ संजय रायबोले,डॉ.चंद्रमणी गजभिये,सर्व पदाधिकारी आणि सदस्य महाराष्ट्रातील सर्व ग्रंथपाल,प्राध्यापक,शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ.राहुल तुपे यांनी प्रभाविपणे केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ.अंजली काळे (संभाजीनगर) यांनी केले.
मोठ्या संख्येने या कार्यक्रमाचा उत्साह वाढवण्यासाठी आभासी पद्धतीने श्रोते उपस्थित होते.संस्थेच्या मार्फत महाराष्ट्रातील समाज सुधारक यांच्या जयंतीनिमित्त आभासी पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन नेहमीच करीत असतात.



