शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर :- पी.एम.श्री.अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा,चिमूर येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने दिनांक 08 एप्रिल 2026 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत सामाजिक समता सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
या सप्ताहाचे उद्घाटन दिनांक 08 एप्रिल 2026 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.उदघाटना प्रसंगी विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी तालूका आरोग्य कर्मचारी यांचेकडून करण्यात आली.
समाजात समता,बंधुता व न्याय यांची जाणीव विद्यार्थिनींमध्ये निर्माण व्हावी या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 09 एप्रिल 2026 रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली.तसेच 2026 हे वर्ष महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त विद्यार्थिनींमध्ये जागृती निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला.
दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित निबंध स्पर्धा घेण्यात आली.त्यानंतर दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात येणार आहे.
याचबरोबर दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी जेष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले असून,समाजातील सर्व घटकांमध्ये जागरूकता वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून,सप्ताहाचा समारोप उत्साहात करण्यात येणार आहे.
या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनिता खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक शिक्षक कु.प्रिया बोरकर,श्री. विनय खापर्डे,श्री.दत्तात्रय पुलेनवार,श्रीमती अनुराधा महाजन,श्री.राजरत्न गजभिये,श्री.पंकज काळे,श्रीमती ज्योत्स्ना नेऊलकर व कु.प्रतिक्षा घ्यार हे परिश्रम घेत आहेत.
सामाजिक समता सप्ताहामुळे विद्यार्थिनींमध्ये सामाजिक जाण, समता व मानवतेचे मूल्य अधिक दृढ होण्यास निश्चितच मदत होणार आहे.



