शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर तालुका अंतर्गत येत असलेल्या मौजा शंकरपूर येथे दीर्घकाळापासून वास्तव्यास असलेल्या अतिक्रमणधारकांना शासनाच्या धोरणानुसार कायमस्वरूपी पट्टे (मालकी हक्क) देण्याबाबत चिमूर उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे,चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने यांना उपसरपंच अशोक चौधरी यांनी निवेदन दिले.
निवेदनात आहे की,मौजा शंकरपूर,तालुका चिमूर,जिल्हा चंद्रपूर येथील अनेक नागरिक गेल्या सुमारे ३० ते ४० वर्षांपासून शासकीय/ग्रामपंचायत हद्दीतील जमिनीवर अतिक्रमण करून वास्तव्यास आहेत.
सदर नागरिकांनी त्या ठिकाणी घरे बांधून आपला स्थायी निवास निर्माण केला असून तेथील वस्ती ही स्थिर व दीर्घकालीन स्वरूपाची आहे.
संबंधित अतिक्रमणधारक हे अत्यंत गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील असून त्यांच्याकडे अन्य कोणतीही पर्यायी जमीन किंवा निवास व्यवस्था उपलब्ध नाही.त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून त्या जागेवर वास्तव्य करून मूलभूत सुविधा उभारलेल्या आहेत.
शासनाच्या विविध धोरणांनुसार (जसे की गायरान/शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमितीकरण संदर्भातील परिपत्रके व निर्णय) पात्र अतिक्रमणधारकांना काही अटींवर जमिनीचे पट्टे देण्याची तरतूद आहे.
सदर नागरिकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर व इतर बाबींमध्ये सहकार्य केलेले आहे,त्यामुळे त्यांचे वास्तव वास्तव्य सिद्ध होते.
मानवी दृष्टिकोनातून व सामाजिक न्यायाच्या दृष्टीनेही अशा दीर्घकाळ वास्तव्यास असलेल्या नागरिकांना कायमस्वरूपी हक्क देणे अत्यंत गरजेचे आहे.
उपसरपंच अशोक चौधरी यांनी उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे आणि चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने यांना नम्र विनंती आहे की,मौजा शंकरपूर येथील अशा सर्व पात्र अतिक्रमणधारकांची सखोल पाहणी करून,शासनाच्या प्रचलित नियम व अटींच्या अधीन राहून त्यांना कायमस्वरूपी पट्टे (मालकी हक्क) मंजूर करण्यात यावेत.
तसेच,यासाठी आवश्यक सर्वेक्षण,नोंदणी व प्रशासकीय कार्यवाही तात्काळ सुरू करून संबंधितांना न्याय देण्यात यावा.याचबरोबर निवेदनाची दखल घेऊन लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्याल,अशी अपेक्षा प्रशासक उपसरपंच अशोक ज्ञानेश्वर चौधरी यांनी व्यक्त केली आहे.



