Home Social सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय करोल यांची माऊलींच्या मंदिराला भेट…

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय करोल यांची माऊलींच्या मंदिराला भेट…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय करोल यांनी आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेऊन समाधीस्थळी प्रार्थना केली. या प्रसंगी त्यांनी मंदिरातील पवित्र वातावरण, स्वच्छता आणि व्यवस्थापनाबद्दल समाधान व्यक्त करत आपली भावनिक प्रतिक्रिया नोंदवली यावेळी विश्वस्त चैतन्य महाराज कबीर, पुरुषोत्तम महाराज पाटील, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर उपस्थित होते.

          “महान विभूती असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी दर्शन घेण्याची आणि प्रार्थना करण्याची संधी लाभली, यासाठी मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजतो. परमेश्वर सर्वांना समान आशीर्वाद देवो,” अशा शब्दांत न्यायमूर्ती करोल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भारतीय संविधानातील तत्त्वांचे पालन करत सर्व सजीवांच्या सेवेच्या भावनेने सोपवलेली कर्तव्ये पार पाडण्यासाठी परमेश्वराचे मार्गदर्शन लाभावे, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.

          मंदिर व परिसर अत्यंत स्वच्छ, नेटका आणि सुव्यवस्थित असल्याचे नमूद करत त्यांनी येथील व्यवस्थापनाचे कौतुक केले. दर्शनासाठी आलेले भाविक आनंदी व समाधानी दिसत असून, कोणत्याही साधकासाठी हे स्थान अत्यंत पवित्र आणि प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

          न्यायमूर्ती करोल यांच्या भेटीमुळे मंदिर प्रशासनानेही त्यांच्या भेटीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शेवटी “परमेश्वर सर्वांचे कल्याण करो,” अशा शुभेच्छा देत त्यांनी आपल्या आळंदी भेटीचा समारोप केला.