दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादिका
मुंबई : विविध सामाजिक संघटनांच्या प्रमुख प्रतिनिधींची आज मुंबईत ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ‘एपस्टीन फाइल’मध्ये पंतप्रधानांचे नाव आल्याच्या दाव्यांवर, अमेरिकेच्या दबावाखाली भारतविरोधी व्यापारी करार झाल्याच्या आरोपांवर तसेच माजी आर्मी प्रमुखांच्या पुस्तकातील उल्लेखांवर सविस्तर आणि तीव्र चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान देशाच्या सार्वभौमत्वाचा प्रश्न अत्यंत गांभीर्याने मांडण्यात आला. आंतरराष्ट्रीय दबावामुळे भारताच्या हिताला बाधा पोहोचेल अशा कोणत्याही करारांबाबत केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच या प्रकरणी पारदर्शक चौकशी व अधिकृत स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.
विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी या मुद्द्यांवर विरोधी पक्षांची उदासीनता असल्याची खंत व्यक्त करत, व्यापक जनआंदोलन उभारण्याची गरज अधोरेखित केली. या पार्श्वभूमीवर आंदोलनाचे नेतृत्व करण्याची विनंती प्रकाश आंबेडकर यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती बैठकीनंतर देण्यात आली.
बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा, राज्यव्यापी जनजागृती मोहीम आणि संघटनांमधील समन्वय याबाबत प्राथमिक आराखडा निश्चित करण्यात आला.
या बैठकीला वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, मुंबई प्रदेश प्रवक्ते अंबरसिंह चव्हाण तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.



