Home Social साखरे महाराज पंप ते देहूफाटा चौक गटार लाईन कामाचा शुभारंभ…

साखरे महाराज पंप ते देहूफाटा चौक गटार लाईन कामाचा शुभारंभ…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी – आळंदी नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्र. ९ मधील साखरे महाराज पंप ते देहूफाटा चौक दरम्यान अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गटार लाईन कामाचा शुभारंभ बुधवारी सकाळी उत्साहात पार पडला. या कामाचे भूमिपूजन आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

       स्थानिक नगरसेवक दिनेश रामदास घुले यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे या कामाला अखेर मुहूर्त मिळाला. प्रभागातील सांडपाणी समस्येमुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हे काम मार्गी लागल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले. या प्रकल्पामुळे परिसरातील स्वच्छतेत सुधारणा होऊन आरोग्यदायी वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे.

        या प्रसंगी उपनगराध्यक्षा सुजाताताई तापकीर, मुख्याधिकारी माधव खांडेकर, माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, गटनेते सचिन गिलबिले, विरोधी पक्षनेते आदित्य घुंडरे, विजय तापकीर, किरण येळवंडे, अक्षय कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर आप्पा वाघमारे, सूरज जंगम, सुदर्शन चौधरी, माऊली पागिरे, मुकेश ढवळे, मनोज गिरासे आदींसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         “प्रभाग स्वच्छ व निरोगी ठेवण्यासाठी कायम प्रयत्नशील आहोत. नागरिकांच्या मूलभूत सोयी-सुविधांना प्राधान्य देत विकासकामे मार्गी लावली जातील,” असे नगरसेवक दिनेश घुले यांनी सांगितले. या कामामुळे प्रभागातील नागरिकांना दिलासा मिळणार असून पावसाळ्यातील पाणी साचण्याच्या समस्येलाही आळा बसणार आहे.