दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : आळंदीतील प्रभाग क्र.३ मधील अन्नपूर्णा नगर ते के.के. हॉस्पीटल या अंतर्गत रस्त्यावरून अवजड वाहनांची वाढती ये-जा नागरिकांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरत असल्याने या मार्गावर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी स्थानिक नगरसेविका पुजा संजय घुंडरे यांनी केली आहे. ट्रक, कंटेनर व डंपरच्या सततच्या वाहतुकीमुळे अपघाताचा धोका वाढला असून परिसरातील रहिवासी, शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक व रुग्णांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.
याबाबत नगरसेविका पूजा संजय घुंडरे यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. तसेच ध्वनी व वायू प्रदूषणात वाढ झाली असून रस्त्याची सुध्दा दुरवस्था होत आहे. यापूर्वी बसविण्यात आलेले स्पीड ब्रेकर अवजड वाहनांच्या दाबामुळे निकामी झाले असून त्या ठिकाणी नव्याने स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच ‘नो एन्ट्री’ फलक व उंची मर्यादा बॅरिकेट्स बसविण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे.
यावेळी नगरसेविका पूजा घुंडरे म्हणाल्या, नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होऊ देणार नाही. एखादी दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी. हा रस्ता अंतर्गत वस्तीतील असल्याने अवजड वाहनांना तात्काळ बंदी घालणे गरजेचे आहे.” दरम्यान, प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.



