Home Maharashtra आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या मतदारसंघात अवैध धंद्यांचा बोलबाला… — त्यांच्या कार्यक्षेत्रातील...

आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या मतदारसंघात अवैध धंद्यांचा बोलबाला… — त्यांच्या कार्यक्षेत्रातील पोलिस अधिकारी हे अवैध धंद्याकडे का म्हणून लक्ष देत नाही!….

 रोखठोक

प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक

           चिमूर विधानसभा मतदारसंघात सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचा बोलबाला असून,या अवैध धंद्याकडे आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्यासह स्थानिक पोलीस अधिकारी व महसूल अधिकारी हे कमालीचे दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट आहे.

            स्वत:ला कार्यक्षम व सक्षम समजणाऱ्या आमदारांच्या आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात अवैध धंद्यांचा बोलबाला असेल तर ते जनतेच्या सुखशांतीकडे,संरक्षणाकडे व उन्नतीकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करतात असेच म्हणावे लागेल…

              आमदारांचा व अधिकाऱ्यांचा त्याग,त्यांचे ज्ञान,त्यांचा अनुभव,हा जनतेच्या कल्याणासाठी,सुखशांतीसाठी, त्यांच्या उन्नतीसाठी,रोजगार निर्मितीसाठी,शेतकऱ्यांच्या हितासाठी,नागरिकांच्या संरक्षणासाठी व सर्व समाज सक्षम करण्यासाठी सार्थकी ठरत नसेल तर त्या आमदारकीला व त्या अधिकारी बान्याला महत्त्व काय? याचे उत्तर आमदार किर्तीकुमार भांगडिया व चिमूर तालुक्यातील संबंधित अधिकारीच देवू शकतात…

            आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या मतदारसंघातील नागरिक हे व्यसनाधीनतेच्या गर्तेत ओढले जावे म्हणून चिमूर तालुक्यातीलच चार ठिकाणावरून खेड्यापाड्यात देशी दारूचा मुबलक प्रमाणात पुरवठा केला जातो आहे.

           याचबरोबर चिमूर तालुक्यात जिकडे-तिकडे सट्ट्यांची अड्डे बिनधास्त सुरू आहेत.सट्याच्या अड्यांची मुख्य केंद्र हे चिमूर,मोटेगाव,शंकरपूर,भिसी,जांभुळघाट,नेरी,खडसंगी ही गावे आहेत.याचबरोबर चिमूर,भिसी येथे व शंकरपूर परिसरात क्लबच्या नावावर जुगारांची अड्डे सुरू असल्याची गोपनिय माहिती आहे.तद्वतच अवैधरित्या वाळूंचे आणि मुरुमांचे धंदे चिमूर तालुक्यात सर्रास सुरू आहेत.

        श्री.किर्तीकुमार भांगडिया हे आमदार झाले आणि मागील ९ वर्षांपासून चिमूर तालुक्यात अवैध धंद्यांना रान मोकळे झाले.तद्वतच कर्तव्यहिन व विना सचोटीचे अधिकारी चिमूर तालुक्यात बसवून अवैध धंद्यांना पुरेसे वातावरण अनुकूल करण्यात आले.

        मागील अनेक वर्षांपासून रस्त्यांच्या कामासाठी अवैध मुरुमाचा,अवैध मातीचा व अवैध वाळूचा मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात आला आहे आणि आजच्या स्थितीतही केला जातो आहे.

           तात्कालीन व सध्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून अवैध वाळू व मुरुम उत्खननाची माहिती दिली तरी,त्यांनी अयोग्य पद्धतीने कागदाचे घोडे रंगवून कंपनीधारकांना,कंत्राटदारांना व लिजधारकांना वाचविण्यातच स्वत:च्या अधिकाराचा दुरुपयोग केला,हे वास्तव आहे.याबाबतची इत्यंभूत माहिती चिमूर तालुक्यातील मोजक्या पत्रकारांना,माजी सरपंचांना व हजारो नागरिकांना माहित आहे.

            अवैध उत्खननाच्या माध्यमातून चिमूर तालुक्यातील खनीज संपदा ही कंपनी धारकाच्या,कंपनी रस्ता कंत्राटदारांच्या,आणि अवैध धंद्येवाईकांच्या घशात घालण्याचे काम नियमीत करण्यात आले आहे आणि आजही सुरू आहे…

          चिमूर तालुक्यातील अवैध धंदेवाईकांवर आणि वाळू-मूरुमांचे अवैध उत्खनन करणेवाल्याइसमांवर,कंपनीधारकांवर कारवाई न करण्याचे कारण काय? याबाबत आमदार किर्तीकुमार भांगडिया आणि संबंधित अधिकारी हे चिमूर विधानसभा मतदारसंघातील जनतेला खुलासेवार सांगतीले पाहिजे…

          लोकसेवक म्हटले की प्रगत,सक्षम,उन्नत,निरव्येशनी समाज घडविण्यासाठी त्यांनी कार्य करणे आवश्यक आहे.नव्हे तर आमदार आणि अधिकारी यांनी जनतेप्रती जबाबदेही राहुन योग्य कर्तव्य आपल्या दायित्वातंर्गत पार पाडले पाहिजे.

            मोठमोठाल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून,”सोंग मोठं काम खोटं,असाच प्रत्यय चिमूर विधानसभा मतदारसंघात सध्यातरी दिसून येत आहे.विकास कामाचा फुगा हा फक्त स्वत:चा गवगवा करण्यासाठी असतोय आणि या सोंगामागील गवगव्यामध्ये पुढील निवडणुकीच्या रणनीतीचा भाग दडलेला असतो…

          रस्त्यांची कामे मंजूर करुन आणणे हा दळणवळणाच्या सुव्यवस्थेचा एक कार्यभाग आहे आणि इमारतीचे बांधकामे मंजूर करुन आणणे पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या सुखसोयींच्या-सुखसुविधांच्या समस्या निकाली काढण्याचा कार्यभाग आहे. 

      तद्वतच इतर इमारतीचे बांधकाम मंजूर करुन समाज घटकांच्या स्वाधिन करणे हा सार्वजनिक कार्यक्रमाचा,सांस्कृतिक कार्यक्रमाचा भाग आहे.

          पण,लोकप्रतिनिधी तेव्हाच कार्यक्षम व सक्षम समजला जातोय,जेव्हा तो आपल्या मतदारसंघातील जनतेच्या संरक्षणाकडे,सुखशांतीकडे,समृद्धीकडे,समस्यांकडे,जातीने बघतोय,जातीने लक्ष देतोय…

              ज्या कार्यक्रमातंर्गत जनतेची उन्नती व शांती साधल्या जात नाही,जनतेचे संरक्षण केले जात नाही,जनतेला व्यशनाधिनतेतून वाचविता येत नाही,जनतेला व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देता येत नाही,जनतेच्या समस्यांना कमी करता येत नाही,अशा तुटक फुटक कार्यक्रमातंर्गत कार्याला महत्त्व उरत नाही.

             ज्या कार्याच्या माध्यमातून जनतेचे प्रश्नच सुटत नाही,ते कार्य शेवटी समस्यांचे उत्तर होत नाही,उलट असे कार्य हे समाज परिवर्तनाला आडकाठी ठरतात हे आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्यासह महाराष्ट्र राज्यातील आमदारांनी,मंत्र्यांनी व अधिकाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे.

             सत्ताधारी आमदारांना,मंत्र्यांना आणि महाराष्ट्र राज्यातील अधिकाऱ्यांना प्रश्र्न आहे की ते चिमूर तालुक्यासह महाराष्ट्र राज्यातील अवैध धंदे बंद करतील का? कारण महाराष्ट्र राज्यातील जनतेच्याप्रती ते जबाबदार लोकसेवक आहेत….