Home देशविदेश नागपूर येथे बामियानच्या बुद्ध पुतळ्याची प्रतिकृती उभारणार…

नागपूर येथे बामियानच्या बुद्ध पुतळ्याची प्रतिकृती उभारणार…

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक…

        अफगाणिस्तानातील बामियानच्या गौतम बुद्धांच्या पुतळ्याच्या विध्वंसाला 25 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथे त्या पुतळ्याची प्रतिकृती उभारण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यपालांना दिला. 

          नागपूर शहर डॉ.आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारून पुनरुज्जीवन घडवून आणलेले ऐतिहासिक ठिकाण आहे.या उपक्रमातून जगाला शांततेचा संदेश जाईल आणि भारत-जपान मैत्रीचे प्रतीक निर्माण होईल,असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

           विविध क्षेत्रातील शिष्टमंडळाने मुंबईस भेट दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी ‘अरिगातो गोझायमास’ असे जपानी भाषेत आभार मानले. विविध क्षेत्रातील शिष्टमंडळाने मुंबईस भेट दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी ‘अरिगातो गोझायमास’ असे जपानी भाषेत आभार मानले.

        जपानच्या वाकायामा प्रांताचे राज्यपाल मियाझाकी इजुमी यांनी जपानच्या शिष्टमंडळासह हॉटेल ताजमहल येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. 

       महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर,जपानचे मुंबईतील महावाणिज्यदूत यागी कोजी,वाकायामा विधानसभेचे उपाध्यक्ष अकिझुकी फुमिनारी यांच्यासह जपानचे शासन,विधिमंडळ,सांस्कृतिक,क्रीडा,उद्योग आदी विविध क्षेत्रातील प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. 

         दोन वेळा झालेल्या जपान दौऱ्यादरम्यान वाकायामा आणि कोयासन येथे भेट दिल्याच्या आठवणी सांगून कोयासन विद्यापीठात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले,हे दोन्ही देशांतील मैत्रीचे प्रतीक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. 

        2023 मध्ये वाकायामाचे दिवंगत राज्यपाल यांच्या उपस्थितीत सुमो पहेलवानांचा संघ मुंबईत आला होता.गेटवे ऑफ इंडिया परिसरात सुमो आणि भारतीय कुस्तीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले,ज्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याची आठवण त्यांनी सांगितली.

          सध्या जपानचे सुमो पहेलवान पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात प्रशिक्षण घेत आहेत.या क्रीडा क्षेत्रातील देवाणघेवाणीमुळे दोन्ही देशांना उत्कृष्ट खेळाडू घडविण्यास मदत होईल,असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

         जपानचे दिवंगत प्रधानमंत्री शिंजो आबे यांची आठवण करीत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,त्यांनी भारताशी मैत्री अधिक दृढ केली.त्यांच्या कार्यकाळात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू झाले.मुंबईत 40 कि.मी. लांबीची भूमिगत मेट्रो,22 कि.मी.लांबीचा देशातील सर्वात मोठा समुद्री पूल उभारण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

   राज्यपाल मियाझाकी इजुमी

महाराष्ट्र आणि वाकायामा दरम्यान कराराचे 2028 मध्ये नूतनीकरण करून नवनवीन क्षेत्रात सहकार्य वाढविण्याचा मानस वाकायामाचे राज्यपाल मियाझाकी इजुमी यांनी व्यक्त केला. ‘वाकायामा हे जपानमधील महाराष्ट्राचे प्रवेशद्वार आहे’ असे सांगून महाराष्ट्र-वाकायामा मधील संबंध नव्या उंचीवर जातील, असे त्यांनी सांगितले.

        राज्यपाल मियाझाकी इजुमी यांनी 2013 मधील पर्यटन आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील करारानंतर दोन्ही राज्यांमध्ये पर्यटन, क्रीडा, सांस्कृतिक देवाण-घेवाण,जागतिक वारसा स्थळांचे संवर्धन,तसेच व्यापार आणि उद्योग क्षेत्रात सातत्याने सहकार्य सुरू असल्याचे नमूद केले.

          डिसेंबर 2023 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आल्याचा उल्लेख करत त्यांनी आनंद व्यक्त केला. 

        वाकायामा प्रांतीय विधानसभेतील सदस्यांनी भारत-जपान मैत्री वृद्धिंगत करण्यासाठी विशेष गट स्थापन केला असल्याचे त्यांनी सांगितले.

           ठाणे येथे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (फिक्की) च्या पुढाकाराने आयोजित कार्यक्रमातून उद्योग आणि आर्थिक सहकार्याला चालना मिळेल,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

            मुख्यमंत्र्यांनी सुचविलेल्या नागपूर येथे बामियान बुद्ध पुतळ्याची प्रतिकृती उभारण्याच्या प्रस्तावालाही सकारात्मक प्रतिसाद देत,या विषयावर पुढील चर्चा करण्याची त्यांनी तयारी दर्शवली.

           मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा जपानला भेट द्यावी,विशेषतः कोयासन आणि वाकायामातील निसर्गरम्य स्थळांना भेट द्यावी,असे निमंत्रण देत त्यांनी भविष्यातील सहकार्याबद्दल आशावाद व्यक्त केला.