दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तक्षशिला बुद्ध विहार, आळंदी देवाची येथे नवनिर्वाचित नगरपरिषद लोकप्रतिनिधींचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी आळंदी पोलिस स्टेशन शेजारी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यासह तक्षशिला बुद्ध विहार परिसरात अभ्यासिका सुरू करण्याची ठाम ग्वाही दिली.
कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, विरोधी पक्षनेते आदित्य घुंडरे, बांधकाम सभापती साक्षी कुऱ्हाडे, महिला व बालकल्याण समिती उपसभापती कांचन येळवंडे, नगरसेवक सागर कुऱ्हाडे व गोविंद कुऱ्हाडे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
आळंदीचे नगराध्यक्ष कुऱ्हाडे म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. स्मारक व अभ्यासिकेच्या माध्यमातून युवकांना योग्य दिशा व प्रेरणा मिळेल.”
कार्यक्रमाची प्रस्तावना आयु.आनंद रणदिवे यांनी केली. समारोप व आभार प्रदर्शन आयु. चारुदत्त रंधवे यांनी केले. या प्रसंगी तक्षशिला बुद्ध विहार समितीचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



