ऋषी सहारे
संपादक
आरमोरी – बालपणीचा काळ सुखाचा तुमच्या-आमच्या हक्काचा मौजमजेचा-आनंदाचा बालपणीचा काळ सुखाचा…
लहानपण असतेच आयुष्यातील आनंदाचे पर्व आणि यासोबत शिक्षण असेल तर दुग्धशर्करा योगच. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘दप्तरमुक्त शनिवार‘ उपक्रम म्हणजे विद्यार्थांना खास पर्वणीच असते. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करून त्यांना आनंददायी वातावरणात शिक्षण देणे, तसेच त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देणे हा या उपक्रमचा हेतू केवळ पुस्तकी ज्ञानापुरते शिक्षण मर्यादित न ठेवता कृतीआधारित शिक्षणातून जीवनकौशल्यांचा विकास घडवून आणण्यावर या उपक्रमात भर देण्यात येतो.
“स्वयंअध्ययनासोबच कौशल्य विकास, डिजिटल तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता यावर विशेष भर देऊन कृतीयुक्त अध्ययन अध्यापन गरजेचे आहे. खेळ व शारीरिक शिक्षण, मैदानी खेळ, योगासने, कवायत, चित्रकला, संगीत, नृत्य, नाटक, हस्तकला, बांबूकाम, मातीकाम, शिवणकाम तसेच टाकाऊतून टिकाऊ वस्तू निर्मिती अशा विविध क्षेत्रात शनिवार आपणास निपूण करेल म्हणजेच दरमुक्त शनिवार,अभ्यासाला सुट्टी नाही, तर आनंदातून शिकण्याची संधी आहे. “असे प्रतिपादन मुख्य कार्यपालन अधिकारी सुहास गाडे यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कासवी येथे बाल आनंद मेळावा अंतर्गत ‘खरी कमाई’ उपक्रमाचे आयोजन प्रसंगी केले.
श्रमाचे महत्त्व, स्वावलंबनाचे धडे तसेच खरेदी–विक्री कौशल्याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी या उद्देशानेजिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कासवी येथे बाल आनंद मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
प्रारंभी ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून मुख्य कार्यपालन अधिकारी सुहास गाडे यांनी कार्यक्रमाचा शुभारंभ केला.
याप्रसंगी जोगीसाखरा केंद्राचे केंद्रप्रमुख कैलास टेभुंर्णे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उदाराम दिघोरे,पत्रकार प्रविण राहाटे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अशोक प्रधान,मुख्याध्यापक अन्वरभाई शेख, गुरुदास लोणारे, साधना कोटरंगे, गायत्री वालदे, प्रतिक्षा किरमिरे,जागृती आठोळे, उर्मिला सयाम, विवेक धोटे, महेश पाल ,रोशन भोयर, अंगणवाडी सेविका ज्योती कानतोडे यांच्यासह विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळाव्याला छोट्या मंडईचेच स्वरूप आले होते. शिक्षक विवेक धोटे यांचेसह विद्यार्थी रितीक सयाम, पवन पुसाम ,चेतन मेश्राम, नैतिक दिघोरे,ओमकार बावणे,युग कांदोर, रिषिकेश कानतोडे, ज्ञानदीप चहांदे, प्रथम मरसकोल्हे, मयंग बांडे , नुतन सयाम यांचे ग्रामीण लोकनृत्य डंडार आकर्षनाचे केंद्र ठरले.
बाल आनंद मेळाव्यातील विद्यार्थ्यांनी व्यावसायिक शिक्षणाचा अनुभव घेत प्रत्यक्ष ‘ खरी कमाई ’ केली. मुख्य कार्यपालन अधिकारी सुहास गाडे यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. सहभागी २५ स्टॉलवर प्रत्येक्ष भेट देत बाल व्यावसायिकांशी संवाद साधला. मेळाव्यात दैनंदिन गृहपयोगी वस्तुसंह खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारले होते.
या स्टॉल्सला विद्यार्थी, शिक्षक, मान्यवर पाहुणे तसेच पालकवर्ग यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सदर उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून व्यवहारज्ञान व आत्मविश्वास प्राप्त झाला. शालेय मंत्रीमंडळ, सखी सावित्री समिती, पालक, कासवी ग्रामस्थ यांचे सहयोगाने उपक्रम यशस्वी संपन्न झाले.



