Home Political कोण जनतेसोबत, कोण खुर्चीसोबत? इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीने राजकारण शिगेला…

कोण जनतेसोबत, कोण खुर्चीसोबत? इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीने राजकारण शिगेला…

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी 

       इंदापूर तालुका स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका 2026 जाहीर होताच इंदापूर तालुका अक्षरशः राजकीय रणांगणात बदलला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी–विरोधक, जुने अनुभवी चेहरे आणि नवे आक्रमक इच्छुक यांच्यात थेट शक्तिप्रदर्शन सुरू झाले आहे. चौकाचौकात, गावोगावच्या बैठकीत आणि संपर्क दौर्‍यांत राजकीय चर्चांनी उधाण आणले आहे.

       “जनतेसाठी कोण उभा राहिला आणि खुर्चीसाठी कोण झुकला?” हा सवाल उघडपणे विचारला जात असून, पाच वर्षांच्या कामगिरीचा हिशोब आता जनताच मागणार असल्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत. रखडलेले रस्ते, पाणीटंचाई, अपूर्ण विकासकामे, आरोग्य व रोजगाराचे प्रश्न, तसेच केवळ कागदावरची आश्वासने—या मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपांना अधिक धार येत आहे.

        दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने उमेदवारांमध्ये प्रचंड लगबग सुरू झाली आहे.

 अर्ज दाखल करण्यास सुरुवात: 16 जानेवारी 2026

अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख: 21 जानेवारी 2026 अर्जाची छाननी 22 जानेवारी 2026 अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 27 जानेवारी 2026 मतदान: 05 फेब्रुवारी 2026 मतमोजणी: 07 फेब्रुवारी 2026 या वेळापत्रकामुळे तालुक्यात राजकीय हालचाली आणखी तीव्र झाल्या असून, संपर्क दौरे, गाठीभेटी आणि गुप्त बैठकांचा सिलसिला वाढला आहे.

         अनेकांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची, तर काहींसाठी थेट अस्तित्वाची लढाई ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. एकूणच, इंदापूर तालुका म्हणजे आता राजकीय सत्तेची चावी ठरणार असून, येथून होणारा निकाल केवळ तालुक्याचेच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारा ठरण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.