Home Political आळंदीतील शेवटच्या घटकांपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवणार :- नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे… —...

आळंदीतील शेवटच्या घटकांपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवणार :- नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे… — आळंदीत नगराध्यक्ष व नगरसेवकांचा पदग्रहण समारंभ उत्साहात…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : “आळंदी हे संत परंपरेचे आणि वारकरी संस्कृतीचे केंद्र आहे. या शहराच्या विकासासाठी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, भूमिगत गटारे, आरोग्य सुविधा आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांना प्राधान्य दिले जाईल. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्था, स्वच्छतागृहे व नदी प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्यात येतील. आळंदीतील शेवटच्या घटकांपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवणार असे मनोगत नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे व्यक्त केले.

       आळंदीत नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी नगराध्यक्ष कुऱ्हाडे बोलत होते. या समारंभास शांतीब्रह्म मारुती महाराज कुऱ्हेकर, डॉ.नारायण महाराज जाधव, भोसरीचे आमदार महेश लांडगे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, आळंदी देवस्थानचे विश्वस्त मंडळ, आजी-माजी पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, वारकरी संप्रदायातील प्रतिनिधी व मोठ्या संख्येने आळंदीकर ग्रामस्थ उपस्थित होते. नगराध्यक्ष कुऱ्हाडे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन दिव्यांग भगिनींच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमातून सामाजिक संवेदनशीलतेचा आणि सर्वांना सोबत घेऊन विकास करण्याचा संदेश देण्यात आला.

     याप्रसंगी आमदार महेश लांडगे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “आळंदीचा विकास करताना अध्यात्मिक ओळख जपली पाहिजे. नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देईल. शासनाच्या विविध योजनांमधून आळंदीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल,” असे आश्वासन दिले. 

         शहराच्या सर्वांगीण आणि नियोजित विकासासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा संकल्प करण्यात आला. आळंदीचा विकास हा केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित न ठेवता सर्वसमावेशक, शाश्वत आणि भाविक-केंद्रित राहील असे प्रतिपादन नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी केले.