Home देशविदेश काव्य… हे माझ्या मना…

काव्य… हे माझ्या मना…

हे माझ्या मना,

कोण होतास तू ? 

काय झालास तू ?

अरे वेड्या मना,

वाया गेलास तू.

हे माझ्या मना

तुझी ही लोकशाही

जिला 

जगात तोड नाही

अरे तू राजा तिचा

स्वयंभू स्वाभिमानाचा

सार्वभौम तू देहाचा

मतदार राजा तू 

या लोकशाहीचा

हे माझ्या मना,

संविधानाने हक्क दिला तुला

मतदान करण्याचा

म्हणूनच

कालचा गुलाम आजचा मालक तू 

हे माझ्या मना,

कर्मचारी अधिकारी नोकर तुझे

आणि धनी तू त्यांचा

आमदार खासदार सेवक तुझे

आणि मालक तू त्यांचा

तरी लाचार भिकारी 

का ? तू त्यांचा ?

अरे माझ्या मना ,

कुंपणाने शेत खाल्ले 

चौकीदार आणि चोरी केली 

तिजोरी फोडली आणि 

तुझा पैसा तुलाच दिला 

लाजविले त्याने तुला 

आणि तू भ्रष्ट झाला 

फसविले त्याने तुला 

मालकाचा गुलाम केला 

आणि

आजचा राजा तू 

कालचा गुलाम झाला 

हे माझ्या मना ,

मतदार राजा तू 

मतदानाचा हक्क तुझा 

मतदान करण्याऐवजी 

मत विक्री केलेस तू 

नव्हे

स्वाभिमान विकलास तू 

आणि परत 

राजाचा रंक झालास तू

मालकाचा गुलाम झालास तू

हे माझ्या मना, 

उठ वेड्या तोड बेड्या 

या भ्रष्ट मनाच्या 

या गुलामीच्या

या विषमतावादी व्यवस्थेच्या 

सांभाळ तुझी लोकशाही 

आणि तुझे लोकराज्य 

हे माझ्या मना. 

        कवी : दत्ता तुमवाड

         सत्यशोधक समाज नांदेड

                 फोन 9420912209